नवी मुंबई : आता खेळातही करिअर होऊ शकते हा दृष्टीकोन पालकांमध्येही दिसू लागला असून विविध खेळांमध्ये आपली मुले उत्तम कामगिरी करताना दिसतात. हाच क्रीडा प्रवाह अधिक गतीमान करुन मुलांच्या अंगभूत गुणवत्तेला अधिकाधिक व्यासपीठ मिळवून देण्याची गरज असून नवी मुंबई महानगरपालिका याच भूमिकेतून विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करीत आहे. आगामी काळात राष्ट्रीय स्तरावर खेळायला जाणार्या नवी मुंबईतील गुणांकनप्राप्त खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याच्या मनोदय महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील एन.एम.एस.ए. येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर सागर नाईक यांचेसमवेत, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती शंकर मोरे, क प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रभाकर भोईर, नगरसेवक संपत शेवाळे व राजू शिंदे, क्रीडा विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आयुक्त दिवाकर समेळ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.
महापौर श्री. सागर नाईक यांच्या शुभहस्ते निखार गर्ग (पुरुष-खुलागट), वैभवी जायदे (महिला-खुलागट), राजस वाठडकर (१७ वर्षाआतील मुले), प्रणव जैन व अलका के (१५ वर्षाआतील मुले व मुली), सिध्दार्थ दास व गौरी कदम (११ वर्षाआतील मुले व मुली) या खेळाडूंना आपापल्या गटातील विजेतेपदाचा महापौर चषक, प्रशस्तिपत्र व पारितोषिक रक्कमेसह प्रदान करण्यात आला.
विविध ७ गटात नवी मुंबईतील ५२८ खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धेत मागील वर्षीपेक्षा सहभाग संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आली. तसेच मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांचाही उत्साह दांडगा होता ही नवी मुंबईला स्पोर्टस् सिटी बनविण्याच्या दृष्टीने समाधानकारक गोष्ट असल्याचे महापौर सागर नाईक यांनी नमूद केले.