नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीचे प्रभाग निश्चिती व आरक्षण जाहीर झाल्याने नेरूळ पश्चिमचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय महत्वाकाक्षांची जोपासना करण्यापायी हालचाली गतीमान झाल्या असून अनेकांनी इतर पक्षांशी संपर्क साधणे सुरूही केले आहे.
नेरूळ पश्चिमेची सुरूवातच नेरूळ सेक्टर 2 परिसरापासून सुरू होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहा पालकर यांनी 15 वर्षे नगरसेविका म्हणून काम सांभाळले आहे. प्रभाग पुर्नरचनेत हा प्रभाग पुरूष ओबीसी झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरूष ओबीसी सक्षम उमेदवार नसल्याने त्यांची मदार पूर्णपणे पुन्हा एकवार स्नेहा पालकर यांच्यावरच अवलंबून असणार आहे. भाजपाकडून दिलीप तिडके यांची या ठिकाणी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे नगरसेवक रंगनाथ औटी हे या प्रभागातून निवडणूक लढविण्यास उत्सूक आहेत. रंगनाथ औटी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भाग व काही गृहनिर्माण सोसायट्या या नेरूळ सेक्टर 2 प्रभागात गेल्या आहेत. 750 पेक्षा आपले अधिक मतदार या प्र्रभागात गेल्याचे औटी समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रभागात पालकर, तिडके, औटी अशी तिरंगी अटीतटीची झुंज पहावयास मिळण्याची शक्यता आहे.
नेरूळ सेक्टर 8 हा प्रभाग महिला ओबीसी झाल्याने विद्यमान नगरसेवक रतन मांडवे यांना या प्रभागातून नशिब आजमावण्यास मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मांडवेंच्या कामामुळे हा प्रभाग मांडवेंचा परिणामी शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने बाहेरच्या प्रभागातील शिवसेनेचे मातब्बर याच प्रभागातून आपल्या गृहीणींना निवडणूकीला उभे करण्याच्या हालचाली करू लागले आहेत. तथापि मांडवेंना नाराज करून अथवा विश्वासात न घेता निवडणूक हालचाली केल्यास हा प्रभाग शिवसेनेला जड जाण्याची शक्यता आहे. या प्रभागातील सर्वच पक्षातील उमेदवारांचे चित्र धुसर असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल लोखंडे यांच्या घरातील उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
नेरूळ सेक्टर 10 हा प्रभाग महिला खुला गटासाठी आरक्षित झाला असला तरी या प्रभागातून विद्यमान नगरसेवक दिलीप घोडेकर यांच्या पत्नी शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची अधिक शक्यता आहे. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेतूनच या प्रभागातील अनेक महिलांनी प्रबळ दावेदारी केल्याने घोडेकर यांच्यासाठी सारे आलबेल नसल्याचे संकेत प्राप्त होवू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश भोर यांच्या घरातील उमेदवारी तर भाजपाकडून तुकाराम कदम यांच्या घरातील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपाला या ठिकाणी आणखी एक प्रबळ आयात जागा जिंकून देण्याची हमखास खात्री असणारा उमेदवार आयात होण्याची शक्यता असल्याने भाजपा तुर्तास वेट अॅण्ड वॉच करत आहे. शिवसेनेतील इच्छूक महिला उमेदवारांची वाढती संख्या घोडेकरांच्या अडचणी वाढविण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी हॅट्ट्रीकवीर नगरसेवक व सध्या शिवसेनेत कार्यरत असलेले रमेश शिंदे हेदेखील आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरविण्याची दाट शक्यता आहे.
सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर 6 चा काही भाग असलेल्या विभागाचा प्रभाग हा अनुसूचित जमातीकरीता महिला प्रभाग आरक्षित झाला आहे. या प्रभागाचे प्रतिनिधीत्व गेली 15 वर्षे नगरसेवक नारायण पाटील यांनी केले आहे. या प्रभागाकरीता राष्ट्रवादीकडून नारायण पाटील, भाजपाकडून मनोज मेहेर, शिवसेनेकडून विरेंद्र लगाडे आणि गणपत शेलार हे प्रबळ दावेदार मानले जात होते. हा प्रभागच अनूसूचित जमाती महिलांकरीता आरक्षित झाल्याने सर्वच इच्छूकांचे स्वप्न भंगले आहे. या प्रभागातून उमेदवारांसाठीच शोधाशोध करण्याची वेळ आता पक्षांवर आलेली आहे.
कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहाचा काही भाग मिळून असलेला निर्माण झालेला प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्रासदाय ठरणार आहे. या प्रभागातून कुकशेतचा ढाण्या वाघ गणले जाणारे सुरज पाटील नवी मुंबईच्या राजकारणात नावारूपाला आलेले आहेत. या प्रभागात कुकशेतची 3000च्या आसपास व नेरूळ सेक्टर सहाची 3300च्या आसपास मतदान असून उद्या नारायण पाटील यांनी या प्रभागावर दावा ठोकल्यास तिकीट कोणाला द्यायचे यावरून गणेश नाईकांपुढे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरज पाटील यांचा सेक्टर सहामध्ये असलेला जनसंपर्क, मित्र परिवार व परिचित घटक जमेस धरता ही जागा सुरज पाटील यांच्या घरातील महिलेलाच मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जागेवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे.
नेरूळ सेक्टर 18,18ए व सभोवतालचा परिसर मिळून झालेला हा प्रभाग पुरूष खुल्या गटासाठी असून या जागेकरीता राष्ट्रवादी काँगे्रसकडून डी.डी.कोलते व गणेश भगत हे प्रबळ दावेदार आहेत. डी.डी.कोलते यांची उच्चविद्याविभूषित प्रतिमा सेक्टर 18 व 18एच्या मतदारांना आकर्षित करू शकते. गणेश भगत यांनीदेखील गतपाच वर्षात केलेली कामे उमेदवारीवर दावा करून आहेत. कोलते व भगत यांच्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस सुरू आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख विजय माने, विभागप्रमुख सुनिल हुंडारे, काशिनाथ पवार यांच्यातच चुरस असून भाजपा प्रबं असंतुष्ठाला खेचून निवडणूकीत चुरस निर्माण करू शकते.
उपमहापौर अशोक गावडे यांचे निवासस्थान असलेला सेक्टर 28 हा परिसर महिला खुल्या गटासाठी आरक्षित झाला असला तरी उपमहापौरांच्या पत्नी निर्मला गावडे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. निर्मला गावडे या पूर्वी 2005 ते 2010 या पाच वर्षात या प्रभागाच्या नगरसेविका होत्या. निर्मला गावडे व त्यांची उच्चविद्याविभूषित मुलगी अॅड. सपना गावडे-गायकवाड हे दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपलब्ध आहेत. शिवसेनेची उमेदवारी फडतरे अथवा बागवान यांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भाजपाकडे या जागेसाठी सध्या तरी तुल्यबळ उमेदवार नाही.
नेरूळ सेक्टर 10चा काही भाग व नेरूळ गाव मिळून बनलेला प्रभाग हा नेरूळमध्ये सध्या बहूचर्चित झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरज पाटील यांची या ठिकाणी उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेकडून नामदेव भगत या मातब्बर नावाची चर्चा सुरू आहे. रमेश शिंदे या ठिकाणी आपले नशिब आजमावण्याची शक्यता आहे.
नेरूळमधील अन्य दोन प्रभागाबाबत फारसे चित्र स्पष्ट नसले तरी सतीश रामाणे , गिरीश म्हात्रे यांच्यासह अन्य पक्षातील काही जणांची दावेदारी या ठिकाणी प्रबळ मानली जात आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका इंदूमती भगत या शिवसेनेच्या वाट्यावर असल्याने नेरूळ गावातील एका प्रभागावर त्या शिवसेनेच्या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.