नवी मुंबई : नेरूळ गाव आणि सेक्टर 20 परिसराकरीता स्थानिक रहीवाशांची समस्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने मार्केट निर्मितीचे काम हाती घेण्याची मागणी शिवसेनेचे नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नामदेव भगत यांनी म्हटले आहे की, नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात पश्चिमेला आपण आल्यास स्थानकाच्या बाहेर आपणास भाजी व मच्छिवाले व्यवसाय करताना पहावयास मिळतील. नेरूळवासियांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर घरी घेवून जाण्याकरीता त्वरीत भाजीपाला व अन्य आवश्यक वस्तू भाजी व मासळी विक्रेत्यांकडून उपलब्ध होतात. या फेरीविक्रेत्यांना मार्केट नसल्याने ते उघड्यावर व्यवसाय करतात. नेरूळ गावातील सेक्टर 20 येथील भुखंडावर मार्केट व्हावे याकरीता आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. राजकीय हेतूने दिशाभूल करून तसेच सत्ताधारी वगातील काही घटक राजकीय आकसापायी या भुखंडावरील नियोजित मार्केटला आडकाठी करत आहेत. मार्केटव्यतिरिक्त व्यायामशाळा, सभागृह व होळीकरता स्वतंत्र जागा असे बहूउद्देशीय विविध उपक्रम राबविण्यासाठी त्याच ठिकाणी मार्केट सोडून जागा उपलब्ध केल्यास आमची कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा विरोध राहणार नसल्याचे भगत यांनी नमूद केले आहे.
आपणास कोणत्याही राजकीय वादात पडण्याची इच्छा नसून परिसर भाजी व मासळी विक्रेता मुक्त होवून स्थानिकांनाही मार्केट उपलब्ध व्हावे आणि परिसर बकालपणामुक्त व्हावा, हाच माझा एकमेव प्रामाणिक हेतू आहे. नेरूळ सेक्टर 20 वरील नियोजित मार्केटच्या भुखंडावर आकसापायी होत असलेले राजकीय नाट्य पाहता महापालिका प्रशासनाने तात्काळ येथील भाजी व मच्छि विक्रेत्यांकरीता मार्केटसाठी नियोजित भुखंडावरील मार्केट बांधणीचे काम युध्दपातळीवर हाती घ्यावे अथवा मार्केटकरीता प्रशासनाने दुसरा भुखंड उपलब्ध करून देण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.