सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व नैना प्रकल्प हे केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या दृष्टीनेदेखील महत्वपूर्ण व महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत, त्यासाठी सिडकोच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचार्याने अधिक जोमाने काम करायला पाहिजे असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सिडको स्नेहसंम्मेलन २०१५ प्रसंगी व्यक्त केले.
६ फेब्रुवारी २०१५ रोजी सिडकोचे स्नेहसंम्मेलन प्रथमच सिडको प्रदर्शन केंद्राच्या भव्य आणि सुसज्ज आवारात पार पडले. सिडकोच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी स्नेहसंम्मेलनात उस्फूर्तपणे भाग घेतला. सिडको कर्मचार्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनीदेखील स्नेहसंम्मेलनाचा मनसोक्त आनंद लुटला. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे स्नेहसंम्मेलनाचे प्रमुख अतिथी होते. त्याचप्रमाणे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची देखील मुख्य उपस्थिती होती.
सिडकोचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सिडकोने विविध स्वरूपाचे २० कलमी कार्यक्रम राबवले आहेत. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणारे सिडको देशातील पहिले महामंडळ आहे असे उद्गार भाटिया यांनी काढले.
आत्तापर्यत अनेक ठिकाणी काम केले, परंतु सिडकोमध्ये ज्या प्रकारे स्नेहसंम्मेलन साजरे केले जाते तसे कुठेच पाहिले नाही असे उद्गार सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी स्नेहसंम्मेलन प्रसंगी काढले.
सिडको स्नेहसंम्मेलनाचे मुख्य अतिथी सयाजी शिंदे तर हा सोहळा पाहून भारावून गेले होते. एखाद्या सरकारी महामंडळात एवढ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा होताना आपण प्रथमच पाहिले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्नेहसंम्मेलनात भाग घेतलेल्या मंडळींचा आणि उपस्थितांचा उत्साह पाहून त्यांना खूप कौतुक वाटले. त्यांनी चित्रीकरणादरम्यान त्यांना आलेल्या अनेक अनुभवांचे आणि मजेशीर गोष्टींचे किस्से सांगितले. त्याचप्रमाणे सिडकोच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात सिडको कर्मचारी – अधिकारी यांच्या सिडको आर्टीस्ट कंबाईनतर्फे उन्मेष २०१५ च्या माध्यमातून अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात आले. नव्या-जुन्या हिंदी-मराठी गाण्यांच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. तर सिडकोच्या तरूण महिला कर्मचार्यांनी विविध नृत्य प्रकार सादर केले. संध्याकाळी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रसिद्ध गायक राहुल सक्सेना व अमृता नातू यांनी सादर केलेल्या बहारदार गाण्यांनी सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. याशिवाय प्रसिद्ध विनोदवीर विकास समुद्रे व प्रणव रावराणे यांनी सादर केलेल्या स्किट्सने तर सर्व उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले.
या मनोरंजनपर कार्यक्रमांबरोबरच सिडकोत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या व उपविजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेते श्री. सयाजी शिंदे व सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला.
यंदा प्रथमच सिडको प्रदर्शन केंद्रात हा सोहळा संपन्न झाला. प्रशस्त जागेत या कार्यक्रमाचा आस्वाद घेताना सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद आणि समाधान लपून राहू शकला नाही. या स्नेहसंम्मेलनाच्या माध्यमातून कामाच्या व्यापातून काहि क्षण विरंगुळ्याचे मिळतात. त्याचप्रमाणे नव्याने रूजु झालेल्या कर्मचार्यांची जुन्या कर्मचार्यांसोबत ओळख होते. या छोट्याशा ब्रेकनंतर सर्वजण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. हाच या स्नेहसंम्मेलनामागचा उद्देश असतो.