नवी मुंबई – भाजपची पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर 670 बुथची तयारी सुरू आहे. यंदा नवी मुंबई महापालिकेत महापौर भाजपचाच असेल,असा विश्वास भाजपचे जिल्हा अध्यक्ष सी.व्ही. रेड्डी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजपने सदस्य नोंदणी मोहिम हाती घेतली आहे. या वेळी व्यासपीठावर आमदार मंदा म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, सरचिटणीस रामचंद्र घरत, रमेश मधेशिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रेड्डी पुढे म्हणाले की, भाजप अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी 10 कोटी सदस्य नोंदणीचा संकल्प केला आहे. त्यानुसार 10 व 11 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील सर्व 670 बुथ वर सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच भाजप कार्यकर्ते घरोघरी जावून सदस्य नोंदणी करणार आहेत. शहरात 18 वर्षावरील लोकसंख्या 8 लाख इतकी आहे. आतापर्यंत 80 हजार सदस्य नोंदणी झाली आहे. या दोन दिवसांत “हर घर भाजपा घर घर भाजपा” या अंतर्गत 1 लाख सदस्य नोंदणी करण्याचे आमचे उद्दीष्ठ असल्याचे रेड्डी म्हणाले. पालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत 2 लाख 35 हजार सदस्य नोंदणी होणार असल्याचे ते म्हणाले. या सदस्य नोंदणी दरम्यान जनतेतूनच पालिका निवडणुकीसाठी कोणते विषय घ्यावे, याची विचाणार केल्यावर वचननामा पुरविला जाईल. पालिका निवडणुकी बाबत बोलतांना ते म्हणाले 15 तारखेनंतर युतीबाबतची भुमिका स्पष्ट होईल. यंदाच्या पालिका निवडणुकीत 60 ते 65 जागांवर भाजपचे उमेदवार निश्चित विजयी होऊन महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिडको संचालक मंडळात संचालक पद रिक्त असून त्यासाठी नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी ईच्छुक असल्याचे रेड्डी म्हणाले.