* तुर्भे, सानपाडयातील एफओबीला मंजुरी ऐरोली नाका येथे भुयारी मार्गाचा प्रस्ताव
* महापालिकेच्या सर्व साधारण सभेत खर्चाला मंजुरी
नवी मुंबई : नवी मुंबईतील विविध ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत धरुन रेल्वे लाईन ओलांडून ये-जा करावी लागत होती.ठाणे- बेलापूर मार्गावरील तुर्भेनाका ते जनता मार्केट येथील रेल्वे क्रॉसिंग, सानपाडा दत्तमंदिराजवळील रेल्वे क्रॉसिंग येथे (पादचारी) एफओबी पुलाची उभारणी करण्याच्या प्रस्तावाच्या खर्चाला महापौर सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवार १०फेब्रुवारी रोजी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ऐरोली नाका येथे भुयारी मार्ग बांधण्याच्या विषयाला गतीमान करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे महापौर सागर नाईक यांनी सांगितले.
महापौर सागर नाईक यांनी घेतलेल्या या महत्वाकांक्षी निर्णयाने नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे लाईन ओलांडून होणारे अपघात टळणार असून नवी मुंबई शहर अपघात मुक्त होण्यास मदत होणार आहे. लोकनेते गणेश नाईक, संजीव नाईक, आ.संदीप नाईक, महापौर सागर नाईक यांच्याकडे सानपाडा, तुर्भे आणि ऐरोली नाका येथील ग्रामस्थांनी अनेकदा पादचारीपूल किंवा भुयारी मार्गाची उभारणी करण्याची मागणी यापुर्वी केली होती. नवी मुंबईचा सर्वांगिण विकास होत असताना विविध ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉसिंग करताना नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या.तुर्भे नाका, सानपाडा, ऐरोली नाका अशा वर्दळीच्या ठिकाणी ही अडचण प्रकर्षाने जाणवत होती. रेल्वे लाईनवर भुयारी मार्ग किंवा पादचारी मार्ग उभारण्याच्या कामास मंजुरी मिळणे हा प्रश्न रेल्वे प्रशासनाशी निगडीत असल्याने लोकनेते गणेश नाईक यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्यासमवेत बैठक केली होती. तर संजीव नाईक यांनी खासदारकीच्या कालखंडात केंद्रीय रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्री यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मध्य रेल्वे डिपॉझिट बेसिकवर ही कामे करण्याचे मान्य केले होते.ऐरोली नाका परिसरात रेल्वे लाईन लगत भुयारी मार्गाची उभारणी करण्यासाठी देखील पाठपुरावा केला होता.
नवी मुंबईतील सानपाडा भागातील दत्त मंदिरात सानपाडा गाव आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने येतात. या ठिकाणी असणारा रेल्वे लाईनवरील पादचारी पुल जीर्ण झाला आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी महापौर सागर नाईक यांनी व्यक्तीश: लक्ष घातले होते. त्यानुसार आज (ता.१०) झालेल्या सर्वसाधारण सभेत सानपाडा येथील पादचारी पुलाची उभारणी करण्यासाठी ४ कोटी ३४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.तर ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भेनाका येथे सद्यस्थितीतील असलेल्या पादचारी पुलाचा विस्तार करुन त्यापुढे रेल्वे क्रॉसिंगवरुन जनता मार्केटपर्यंत या पुलाचा विस्तार करण्याच्या कामासाठी ६ कोटी ७४ लाख रुपयांच्या कामाच्या प्रस्ताविताला मंजुरी देण्यात आली.त्याच बरोबर ऐरोलीनाका येथील ऐरोली बस डेपो ते ऐरोली नाका व ऐरोली गावाकडे जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद असल्याने त्याच प्रमाणे रेल्वे स्थानक जवळ असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती तर ऐरोली नाका येथे रेल्वे लाईन ओलांडताना अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला होता.या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याच्या विषयाला गतीमान करण्याची ग्वाही सागर नाईक यांनी दिली आहे. ऐरोली येथील भुयारी मार्गाच्या कामासाठी काही तांत्रिक अडचणी असून सदरचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याचे सूचित केले. यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार असल्याची ग्वाही महापौर सागर नाईक यांनी सभागृहाला दिली. महापौर सागर नाईक यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाने नवी मुंबईतील जीव मुठीत धरुन प्रवास करणार्या त्याच बरोबर रेल्वे लाईन ओलांडताना अनेकांना प्राण गमवावे लागले होते याला आता विराम मिळणार आहे.