अनंतकुमार गवई
नवी मुंबई : कुकशेत गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांनी १४ फेब्रुवारी रोजी परिसरातील महिलांकरीता कौंटूबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कुकशेत गावातील गांवदेवी मैदानावर सांयकाळी ६ वाजता या कौंटूबिक स्नेह मेळाव्यास सुरूवात होणार असून या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत. कुकशेत गावातील व नेरूळ सेक्टर १० मधील महिला बचत गटांनी या मेळाव्याकरीता सुरज पाटील यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक , महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा म्हणून ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा कार्यसम्राट आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक उपस्थित राहणार आहे. कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईच्या राजकारणात ओळखल्या जाणार्या सुरज पाटील यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांना अल्पावधीतच कुकशेत गावाचे शिल्पकार म्हणून ओळखले जावू लागले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलावंत संतोष जुवेकर या कार्यक्रमात सहभागी होणार असून याबरोबरच या कार्यक्रमात ज्ञानेश्वर मेश्राम, अभिजित कौंसबी, चंद्रकांत शिंदे, प्रसन्नजीत कौंसबी, अनघा ढोमसे, सुरेश शुक्ला आदी दिग्गजांचा समावेश असणारा संगीतमय कार्यक्रमदेखील यावेळी होणार आहे.
या कौंटूबिक मेळाव्यात नेरूळ नोडमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले आहे.