काँग्रेसी चळवळीतील नामदेव भगत आणि अलीकडच्या काळातील शिवसेनामय झालेले नामदेव भगत ही एकाच माणसाची दोन रूपे पाहिल्यावर कमालीचा विरोधाभास पहावयास मिळतो. काँग्रेसी प्रवाहात गटबाजीमुळे हतबल झालेले नामदेव भगत आणि शिवसैनिकांच्या पाठिंब्यामुळे युवकासारसारखे शिवसेना संघटनेला सर्वस्व समर्पित करणारे नामदेव भगत हा एक सुखद बदल नामदेव भगत यांच्या कार्यकर्त्यांना व समर्थकांना गेल्या काही दिवसामध्ये जवळून पहावयास मिळत आहे, अनुभवयास मिळत आहे. शिवसेनामय झालेल्या नामदेव भगतांनी सोशल मिडीयामध्ये मारलेली मुसंडी व सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्व थरातील शिवसैनिकांशी नामदेव भगतांचा वाढता सुसंवाद ही त्यांच्या अन्य राजकीय पक्षातील विरोधकांसाठी चिंताजनक बाब बनली आहे. शिवसेनामय झालेल्या नामदेव भगतांनी सोशल मिडीयामध्ये मारलेल्या मुसंडीमुळे नवी मुंबईतील युवा वर्गात त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावू लागला आहे.
अडीच दशकाहून अधिक काळ नामदेव भगत हे नवी मुंबईच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. काँग्रेस पक्षात कोणतीही कौंटूबिक राजकीय पार्श्वभूमी नसतानाही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षीय कामकाजात सक्रिय झालेल्या नामदेव भगत यांनी युवक काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणिस अशी पक्षीय पातळीवर संघटनात्मक जबाबदारीची कमान चढतीच ठेवली ती आपल्या कामाच्या पाठबळावर. नगरसेवक, विरोधी पक्ष नेता नंतर सिडको संचालक अशा विविध स्वरूपात नामदेव भगत यांची कामगिरी नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाली आणि अनुभवयासदेखील मिळाली.
नामदेव भगत यांनी 23 जानेवारी 2015 रोजी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचा जय महाराष्ट्रचा नारा शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत स्किारला. नामदेव भगत यांच्या काँग्र्रेसच्या राजीनामापत्रावर नजर फिरविली असता, त्यांनी छातीवर दगड ठेवून हा भावनात्मक निर्णय घेतल्याचे पहावयास मिळते. हा निर्णय त्यांनी सहजासहजी घेतलेला नाही, काँग्रेस सोडताना त्यांना किती भावनिक वेदना झाल्या असतील याची कल्पना त्या राजीनामापत्रावरून सहजगत्या येते. काँग्रेस पक्षावर नामदेव भगत नाराज नव्हतेच. पक्षाने त्यांना नेहमीच भरभरून दिल. पण नवी मुंबईतील गटबाजीमुळे अलीकडच्या काळात नामदेव भगत व्यथित झाले होते. पक्षातील अन्य घटक पक्षसंघटना वाढीस लागण्यासाठी परिश्रम करण्याऐवजी नामदेव भगत यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचाच एककलमी कार्यक्रम राबवित राहीले. नामदेव भगत यांना संपविण्याच्या नादात काँग्रेस पक्षालाच संपविण्याचे काम त्यांच्या पक्षीय विरोधकांकडून जाणिवपूर्वक करण्यात आले. 2000 सालची महापौर निवडणूक असो अथवा 2014ची विधानसभा निवडणूक असो. काँग्रेस पक्षाने नामदेव भगत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित त्यांना उमेदवारी दिली. महापौर निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी नामदेव भगत यांना दगाफटका केला. महापौरपदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे नामदेव भगत पराभूत झाले, परंतु त्याचवेळी उपमहापौरपदाच्या निवडणूकीत काँग्रेसचे अनिल कौशिक विजयी झाले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी दगाफटका केल्याने महापौरपदी नामदेव भगत यांचा नाही तर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. काँग्रेस पक्षाला महापौर पदाने हुलकावणी दिली. 2009च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या अस्तित्वाचा नारा पुकारत अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना निवडणूक लढविलेल्या नामदेव भगत यांना जितके मतदान प्राप्त झाले, तितकेच मतदान नामदेव भगत यांना 2014 साली काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना प्राप्त झाले. काँग्रेस पक्षाचे बर्यापैकी नगरसेवक बेलापुर मतदारसंघात असतानाही नामदेव भगत यांचे फारसे काम काँग्रेसच्या नगरसेवकांनी व पक्षीय पदाधिकार्यांनी केले नाही. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस, सिडको संचालक व बेलापुर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार नामदेव भगत यांचे निवडणूकीत काम करण्याऐवजी काही नगरसेवकांनी व स्थानिक भागातील मातब्बर पदाधिकार्यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा यांचे काम करण्यात समाधान मानले.
विधानसभा निवडणूकीतील पराभवाचे शल्य नामदेव भगत यांना निश्चितच बोचले असणार. निवडणूकीत हार-जित ही होतच असते. परंतु त्याहीपेक्षा त्यांना वेदना अधिक झाल्या, त्या म्हणजे प्रत्येक वेळी काँग्रेसच्या गटबाजीमुळेच काँग्रेस पक्षाची हानी होत असल्याबाबत. त्यांनी पक्षविरोधी कारवाया करणार्यांबद्दल पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली. पक्षातील वरिष्ठांकडून या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. पक्षाने गुणवत्ता व संघटनात्मक कामाचा निकष लावत नामदेव भगत यांना नेहमीच देण्याचे काम केले, परंतु पक्षांतर्गत विरोधकांनी पक्षविरोधी काम करत नामदेव भगत यांचा पर्यायाने पक्षाचाच पराभव करण्याचे ध्येय गाठले. यामुळे व्यथित झालेल्या नामदेव भगत यांनी तब्बल अडीच महिने विचारमंथनात वेळ घालविला. जवळच्या कार्यकर्त्यांशी, समर्थकांशी, हितचिंतकांशी सल्लामसलत करून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. पक्षातील पदाचा राजीनामा दिला. पक्षाला राजीनामापत्र देताना आपली भूमिका स्पष्ट करून सांगितली. पक्षावर आपण काहीही नाराज नसून पक्षाने आपल्याला नेहमीच भरभरून दिल्याचे सांगत नामदेव भगत यांनी राजीनामापत्रातही पक्षाबाबत कृतज्ञताच व्यक्त केली. नामदेव भगत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर नव्याने कात टाकल्याप्रमाणे त्यांची वाटचाल राहील्याचे पहावयास मिळत आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांनी सर्वप्रथम शिवसेनेत कार्यरत असणार्या सर्वांच्याच घरी जावून त्यांच्या कार्यालयात जावून भेटीगाठी घेतल्या. राजकारणात मी अडीच दशकाहून अधिक काळ कार्यरत असलो तरी शिवसेना संघटनेत मी नवीन असल्याचे प्रामाणिकपणे सांगत संघटनावाढीसाठी जे जे लागेल ते माझी एक शिवसैनिक या नात्याने करण्याची तयारी आहे. आपण जी जी जबाबदारी सोपवाल, ती कामे करण्यास आपण मागे हटणार नसल्याची ग्वाहीदेखील त्यांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेतील सर्वच लहान-मोठ्या पदाधिकार्यांना दिली. 23 जानेवारीपासून ते आजतागायत शिवसेना संघटनेत एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणूनच तनमनधन समर्पित करूनच कार्यरत आहेत. शिवसेनेतर्फे त्यांनी नुकताच आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करून दाखविले.
शिवसेनेत प्रवेश केल्यावर सोशल मिडीयात नामदेव भगत यांनी कमालीची आक्रमकता दाखवित मुसंडी मारली आहे. ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्स अप आदी माध्यमातून शिवसैनिकांशी व नवी मुंबईकरांशी नामदेव भगत यांची जवळीक वाढत चालली आहे. एकाद्या 18-20 वर्षाच्या शिवसैनिकांसम नामदेव भगत शिवसेनेसाठी काम करत आहे. नामदेव भगत यांच्या आगमनानंतर नेरूळ पश्चिम बर्याचअंशी भगवामय झाल्याचे पहावायस मिळत आहे. संघटनात्मक कामकाजाबाबत पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनातून नामदेव भगत सध्या काम करत असून नवी मुंबईतील विविध प्रलंबित समस्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे लेखी निवेदनातून लक्ष वेधत आहेत.
काँग्रेसी प्रवाहात विसावलेले नामदेव भगत संयमी होते, पण शिवसेनामय झालेले नामदेव भगत हे खर्या अर्थांने पुन्हा एकवार लढवय्ये झालेले पहावयास मिळत आहे. शिवसैनिकांनादेखील बेलापुर मतदारसंघात नामदेव भगतांच्या रूपाने एक आक्रमक व लढवय्ये नेतृत्व प्राप्त झाले आहे. शिवसेना संघटनेत जेमतेम महिनाभरापूर्वी आलेले भगत आजमितीला पूर्णपणे शिवसेनामय झालेले पहावयास मिळत आहेत.
– अनंतकुमार गवई