नवी मुंबई : सिडको मिठागर कामगारांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधा व भुखंड देण्यास बांधिल आहे. मिठागर कामगारांकरीता राज्य शासनाकडे मी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. मिठागर कामगारांनी त्यांच्याकडील सत्य माहितीचे संकलन करून माझेकडे जमा केल्यास अल्पावधीतच त्यांच्या सर्व समस्यांचे मी निवारण करून देईन असे प्रतिपादन भाजपाच्या बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
महाशिवरात्रीनिमित्त सारसोळे खाडीअंर्तगत भागात कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून सारसोळेच्या ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या बामनदेवाच्या भंडार्यात बामनदेवाच्या दर्शनासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आल्या होत्या. देवदर्शन झाल्यावर भंडार्यात सहभागी झालेल्या सारसोळेच्या ग्रामस्थांनी विशेषत: महिलांनी मंदाताई म्हात्रेंचे उत्स्फूर्त स्वागत केले. मंदाताई म्हात्रेंशी चर्चा करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला मंदाताई जवळ बसल्या होत्या. त्यावेळी भंडार्यात सहभागी झालेल्या ग्रामस्थांशी सुसंवाद साधताना मिठागरांच्या समस्यांना ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना मंदाताई उत्तरे देत होत्या.
मिठागरामध्ये काम केलेल्या ग्रामस्थांना न्याय मिळणे आवश्यक असून आपण गेली अनेक वर्षे प्रशासन दरबारी संघर्ष व पाठपुरावा करत असल्याचे सांगून आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, मिठागरात काम केल्याबाबतचे कागदपत्रांचे संकलन करून संबंधितांनी माझ्याशी संपर्क साधावा. मिठागरात काम केलेल्यांना सोयीसुविधा व भुखंड उपलब्ध करून देण्यास सिडको तयार आहे. तुम्ही मिठागरात काम केलेल्या ग्रामस्थांची यादी कागदपत्रासह संकलित करून माझ्याकडे द्यावी. अल्पावधीतच मी त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा दिलासा आमदार मंदाताई म्हात्रेंनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिला.
कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मंदाताई म्हात्रेंचा सत्कार केला. यावेळी मनोज मेहेर यांनी सारसोळे गावातील ग्रामस्थांना भेडसावणार्या जेटीसह सर्व समस्यांचा विस्तृतपणे उहापोह केला. आमदार मंदाताई म्हात्रेंनी ग्रामस्थांच्या सर्व समस्या मला लवकरात लवकर निवेदनातून माध्यमातून द्या, अल्पावधीतच समस्यांचे निवारण झालेले असेल असा दिलासा आमदार मंदाताई म्हात्रेंनी ग्रामस्थांना दिला.
ग्रामस्थांच्या सर्व शंकाचे निवारण आमदार मंदाताई म्हात्रेंनी केल्यावर बराच वेळ ग्रामस्थ महिलांचे मंदाताईंसमवेत फोटोसेशन सुरू होते. मंदाताई समवेत ग्रामस्थ महिलांना नृत्याचा तालही धरला होता. मंदाताई या सारसोळे गावच्या नातलग असून या गावाशी त्यांचे असलेले भावनिक नाते असल्याने ग्रामस्थांकडून मंदाताईंना विशेष आपुलकीची वागणूक यावेळी देण्यात आली.