नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रभाग पुर्नरचनेमुळे व आरक्षण सोडतीमुळे राजकीय प्रस्थापितांना हादरे बसले असून नव्याने निर्माण झालेल्या प्रभागाकरीता ‘दादा, मलाच महापालिकेचे तिकीट पाहिजे’ असा हट्ट बोनकोडेचरणी होवू लागल्याने कोणाला गोंेजारावे आणि कोणाला समजावे असे संकट बोनकोडेश्वरांपुढे निर्माण झाले आहे.
गणेश नाईक व त्यांचा परिवार आणि समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करून अन्य पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या दीड महिन्यापासून नवी मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तारीख पर तारीख होत असल्याने राजकीय घटकांचा अपवाद वगळता नवी मुंबईकरांनाही त्यात फारसे स्वारस्य राहीले नसल्याचे आता उघड होवू लागले आहे. दादांनी पक्ष बदलला अथवा नाही बदलला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकांश नगरसेवकांनी आपली राजकीय गणिते सांभाळताना इतर पक्षामध्ये तिकीटसाठी संधान बांधले असल्याचे आता लपून राहीलेले नाही. फक्त दादा भूमिका काय घेतात, यावर संबंधितांची भूमिका अवलंबून असणार आहे. प्रभाग पुर्नरचनेमुळे व आरक्षण सोडतीमुळे अनेकांच्या राजकीय अस्तित्वावर संकट निर्माण झाले आहे.
संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
भाग २
नवी मुंबई : प्रभाग पुर्नरचना व आरक्षण प्रणालीमुळे कुकशेत गाव प्रभागाचे झालेले विभाजन बोनकोडेश्वरांपुढे अडचणी निर्माण करणारे आहे. सारसोळे गाव व सेक्टर सहामधील काही भाग मिळून नव्याने झालेला प्रभाग हा अनूसूचित जमातीसाठी आरक्षित झालेला आहे. दुसरीकडे कुकशेत गावाच्या प्रभागाचे विभाजन होवून त्यातील काही भाग शिवसेना नगरसेवक सतीश रामाणेंच्या प्रभागाला तर काही भाग सारसोळेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पाटील यांच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. या नव्याने निर्माण झालेल्या प्रभागावर नारायण पाटील यांनी व सुरज पाटील यांनी दावा ठोकल्याने बोनकोडेपुढे अडचण निर्माण झालेली आहे. हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने नारायण पाटील हे आपली सूनेसाठी तर सुरज पाटील आपल्या पत्नीसाठी प्रयास करत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सूत्रांकडून दिली जात आहे.
कुकशेत गाव हा नगरसेवक सुरज पाटील यांचाच बालेकिल्ला असल्याचे लोकसभा व विधानसभा निवडणूकीत स्पष्ट झालेले आहे. लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेची वावटळ असतानाही कुकशेत प्रभागातून सुरज पाटील यांनी डॉ. संजीव नाईकांना ४५०चे मताधिक्य दिले होते. विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांना सुरज पाटील यांनी ९५० पेक्षा अधिक मतांचे मताधिक्य मिळवून दिले होते. कुकशेत प्रभागाकरीता आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी रक्त आटविले असल्याने हा प्रभाग दुसर्या कोणाच्या स्वाधीन करण्यास सुरज पाटील तयार नाहीत तर दुसरीकडे सारसोळे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने व आपले हक्काचे मतदार हे नवीन प्रभागात गेल्याने नारायण पाटील नवीन प्रभागावरील आपला हक्क सोडण्यास तयार नाहीत. सुरज पाटील व नारायण पाटील यांच्या प्रभागावरून निर्माण झालेल्या वादात बोनकोडे कोणाची बाजू घेणार, हे तिकीटवाटपातच पहावयास मिळणार आहे.
सुरज पाटील यांनी कुकशेत गावात आयोजित केलेल्या कौंटूबिक स्नेहमेळाव्याचे बॅनर नेरूळ सेक्टर सहामध्ये लावले होते. समाजमंदीराजवळ लावलेल्या बॅनरवरील सुरज पाटील यांचा फोटो कोणीतरी फाडल्याने सुरज पाटील समर्थकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात सुरज पाटील यांच्या मित्र परिवाराने सुरज पाटील यांच्याकरीता मोर्चेबांधणीस सुरूवात केली असून सुरज पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती इतरांना देण्यास सुरूवात केली आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात आणि सारसोळे गावातील युवकांमध्ये सुरज पाटील यांचा व्यक्तिगत संपर्क असल्याने याठिकाणी ‘लीड’ काढणे अवघड नसल्याचा दावा सुरज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
या प्रभागाकरीता नारायण पाटील यांनी आपली सून समुद्रा पाटील यांच्याकरीता दावा केला आहे. त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक प्रभाग महिला अध्यक्षा असून महिला बचत गटांमध्ये त्यांची विशेष जवळीक आहे. त्यातच नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या दोन सोसायट्या, खासगी सोसायट्या , गावठाणाचा भाग हा आपले हक्काचे मतदार असल्याचा दावा नारायण पाटील यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.
नव्याने निर्माण झालेल्या या प्रभागात कुकशेतच्या तुलनेत सारसोळे व नेरूळ सेक्टर सहाचे मतदार अधिक असले तरी कुकशेतचे सर्वाधिक मतदान खेचून सारसोळे व सेक्टर सहाचे मतदान खेचून सुरज पाटील आपल्या पत्नीला या प्रभागातून सहज विजयी करू शकतात, असा दावा सुरज पाटील यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. सुरज पाटील यांनी कुकशेत गावात केलेल्या विकासाची मांदियाळी व नेरूळ सेक्टर १०च्या सिडकोच्या ५ सोसायटीतील कामे या जोरावर नेरूळ पश्चिमला सुरज पाटील यांचा नावलौकीक आहे. त्यामुळे नव्याने महिला ओबीसीकरीता आरक्षित असलेल्या प्रभागावर नारायण पाटील या ज्येष्ठ नगरसेवकांने व सुरज पाटील या कार्यसम्राट नगरसेवकाने केलेला दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे पर्यायाने बोनकोडेपुढे अडचणी निर्माण करणार्या आहेत.
एकाच प्रभागाकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही नगरसेवकांनी केलेला दावा आणि दोन्ही जणांनी बोनकोडेदरबारी मागितलेला न्यायनिवाडा यामुळे नेरूळ पश्चिमेच्या राजकारणात हा मतदारसंघ चर्चेचा व बहूप्रतिष्ठीत बनला आहे. या जागेवरून निर्माण झालेला एकाच पक्षातील राजकीय कलह पाहता कुकशेत-सारसोळेची पाटीलकी पणाला, दादा देणार उमेदवारी कोणाला? याकडेच नेरूळ पश्चिमचे लक्ष लागून राहीले आहे.