संदीप खांडगेपाटील – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : पावणे दोन महिन्यांनी नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मतदारसंघ पुर्नरचनेमुळे ८९ प्रभागांच्या संख्येत वाढ होवून १११ महापालिकेचे प्रभाग होत आहे. आगामी सभागृहात ५६ महिला नगरसेविका व ५५ पुरूष नगरसेवक राहण्याची शक्यता आहे. महिला नगरसेविकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये महापालिकेचे प्रभाग अधिक आहेत. महापालिकेच्या आगामी सभागृहात ऐरोली मतदारसंघाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील बदलत्या जनाधारामुळे बोनकोडेचे राजकीय महत्व काही अंशी कमी होवू लागले आहे. आगामी महापालिका निवडणूकीत ऐरोली मतदारसंघामध्ये आमदार संदीप नाईकांची लोकप्रियता व जनाधार पणास लागणार असून महापालिकेची समीकरणे व बोनकोडेची पत दोन्ही गोष्टी आता संदीप नाईकांच्या मतपेटीतील जनाधारावरच अवलंबून असणार आहे.
संदीप नाईक हे लोकनेते गणेश नाईकांचे पुत्र असले तरी त्यांनी राजकीय व सामाजिक वाटचालीचा श्रीगणेशा बहूजन वर्गातूनच केलेला असल्यामुळे त्यांचे आजही पाय जमिनीवरच आहेत. मोदी लाटेत लोकसभा निवडणूकीदरम्यान ऐरोली मतदारसंघातून डॉ. संजीव नाईकांना २२ हजाराची पिछाडी भेटल्यावर संदीप नाईकांचे राजकारण संपल्याच्या चर्चांना खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनच खतपाणी मिळत गेले. दादा कसेही सिट काढतील, पण भाईंचे काही खरे नाही अशी खासगीत हाकाटीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून तसेच बोनकोडेच्या समर्थकांकडून पिटली जात होती. पण संदीप नाईक शांत व संयमी असल्यामुळे त्यांच्या मनात असणार्या वादळाची चाहूल खुद्द त्यांच्या चेहर्यालाही लागली नाही. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख विजय चौगुले व भाजपाकडून युवा वर्गाच्या गळ्यातील ताईत असणारे वैभव नाईक समोर असतानाही संदीप नाईक आठ ते अकरा हजार मताधिक्याने जागा काढणार हा दावा संदीप नाईकांच्या कडवट समर्थकांकडून उघडपणे केला जात होता. कारण जे संदीप नाईकांना मानतात, त्यांच्या परिश्रमाला जाणतात. त्यांना माहिती आहे की संदीप नाईक काय रसायन आहे. हा माणूस कितीही स्तुती झाली तरी खुश होत नाही, कितीही टीका झाली तरी नाराज होत नाही. एक वादळ मनात घेवून वावरणारा व जमिनीवर पाय असणारा संदीप नाईक हा महाराष्ट्राच्या आगामी राजकारणातील स्टार असल्याचे आजही संदीप नाईकांच्या कडवट समर्थकांकडून सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणूकीत आठ हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेत संदीप नाईकांनी शिवसेना-भाजपाच्या मातब्बर उमेदवारांचा पराभव केला. संदीप नाईक पडणार अशा सातत्याने चावडीगप्पा मारणार्या बोनकोडेच्या बिभीषणांचेही दात संदीप नाईकांनी कृतीतून त्यांच्याच घशात कोंबले. अर्थांत संदीप नाईकांच्या यशामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा, लोकनेते गणेश नाईकांपेक्षा व्यक्तिगत संदीप नाईकांचे परीश्रम, संदीप नाईकांची रणनीती, संदीप नाईकांची व्यूहरचना, संदीप नाईकांची प्रचारयंत्रणेतील स्वतंत्र पथक आदी बाबींचा सिंहाचा वाटा होता.
ठाणे जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघाचाच नाही तर महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघाचा तुलनात्मक विकासकामांचा आढावा घेतल्यास संदीप नाईकांची कामगिरी खरोखरीच सरस आहे. कागदोपत्री आकडेवारीची चाचपणी केल्यास पहिल्या १५ मध्ये विकासकामांच्या निकषावर ऐरोली मतदारसंघाचा क्रमांक लागतो. जनसंपर्काच्या बाबतीत संदीप नाईकांच्या जवळपासही कोणीही फिरकणार नाही. आजही ऐरोली, घणसोली कॉलनी, बोनकोडे या तीनही ठिकाणच्या कार्यालयात संदीप नाईक सातत्याने हजेरी लावून मतदारांशी सुसंवाद साधून त्यांच्या अपेक्षांचा व समस्यांचा अंदाज घेत असतात. वास्तविकपणे संदीप नाईकांनी केलेल्या कामाचा अहवाल, जनसंपर्क, मतदारांशी सुसंवाद, पायी चालत मतदारसंघाच्या कानाकोपर्यात केलेली पायपीट पाहता संदीप नाईकांनी विधानसभा निवडणूकीत प्रचार केला नाही तरी २५ हजारापेक्षा अधिक मतांनी संदीप नाईकांना विजय मिळणे आवश्यक होते.
लोकसभा निवडणूकीत मतदारांच्या मानसिकतेचा अंदाज आल्यावर संदीप नाईक व त्यांचे कडवट समर्थक खर्या अर्थांने सावध झाले. अमराठी घटक व परप्रातिंय टक्का भाजपामय होत असल्याचे संकेत लोकसभा निवडणूक निकालातच प्राप्त झाले. संदीप नाईकांच्या स्वभाव गुणाची एक खासियत मानावी लागेल ते म्हणजे लोकांना झुलवत ठेवणे अथवा आश्वासने देवून लोकांना फसविणे हा संदीप नाईकांचा पिंडच नाही. काम होत असेल तर संदीप नाईक हो सांगतात, नसेल होत तर संदीप नाईक स्पष्टपणे नाही म्हणून सांगतात. संदीप नाईकांनी रोजगार निर्मितीसाठी सातत्याने परिश्रम सुरूच ठेवले असून आज नवी मुंबईत रोजगार मिळालेल्यांची संख्या ही शेकडोंच्या नाही तर हजारोंच्या घरात आहे.
नवी मुंबईच्या कानाकोपर्यात सातत्याने पायपीट करून अधिकांश भागाची प्रत्यक्ष पाहणी करणारे संदीप नाईक हे आजतागायतचे एकमेव राजकारणी आहेत. गणेश नाईकांना लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार ही लोकांनी मानाची पदवी दिली असली तरी संदीप नाईकांनी सातत्याने जनसंपर्काकरीता नवी मुंबई जितकी पादाक्रांत केली असेल तितकी आजही गणेश नाईकांनीही नक्कीच केली नसणार.
लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील घडामोडीनंतर नवी मुंबईच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्यायाने गणेश नाईकांच्या लोकप्रियतेचा ग्राफ घसरू लागला आहे. समर्थकांनी नवीन घरोबा शोधण्याचे काम सुरू केले आहे. दादांनी पक्ष बदलावा, भूमिका स्पष्ट करावी असा बेंबीच्या देठापासून टाहो फोडणारे शिवबंधनात अडकू लागले आहेत. अनेकांनी भाजपाचे दरवाजे ठोठावण्यास सुरूवात केली आहे.
येवू घातलेली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लोकनेते गणेश नाईकांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. नाईक समर्थकांच्या निष्ठेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागले आहे. सोमवारी, दि. २३ फेब्रुवारी रोजी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात लोकनेते गणेश नाईक यांची भूमिका स्पष्ट होणार असली तरी नाईक परिवाराचा करिश्मा राखण्याची कामगिरी आता खर्या अर्थांने संदीप नाईकांनाच करून दाखवावी लागणार आहे. महापालिका निवडणूकीत शिवसेना-भाजपाची युती होण्याची सध्यातरी सुतरामही शक्यता दिसत नाही. बेलापुर विधानसभा मतदारसंघामधून किमान २० नगरसेवक विजयी करण्याची किमया महापौर सागर नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांना करावी लागणार आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक किमान ३५ नगरसेवक सहजगत्या विजयी करू शकतात, असा दावा मतदारसंघ पुर्नरचनेनंतर व आरक्षणानंतर संदीप नाईकांचे कडवट समर्थक उघडपणे करू लागले आहेत. स्पष्ट बहूमत नाही मिळाले तरी बहूमतासाठी कदाचित ज्या ६ ते ७ जागा कमी पडतील, त्या जागाची जमवाजमव करणे बोनकोडेकरांना अशक्य नाही. १६ नोव्हेंबर २००२च्या महापौर निवडणूकीत १६ नगरसेवकांचे संख्याबळ दिमतीला असूनही संजीव नाईकांना तब्बल ४२ मते मिळाल्याचे उभ्या महाराष्ट्राला जवळून पहावयास मिळाले होते. या निवडणूकीत संदीप नाईकांनी पडद्याआडून महत्वाची भूमिका बजावली होती. आमदार संदीप नाईकांचे लोकनेते गणेश नाईकांवर बेफाम प्रेम आहे. महापालिकेतून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महापालिकेच्या अधिकाधिक जागा जिंकून महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी एव्हाना संदीप नाईकांच्या हालचाली सुरूही झाल्या आहे. निवडणूक रणनीती आखली गेलीही असणार.
महापालिका निवडणूकीतील जनाधारावर महाराष्ट्राच्या राजकारणात गणेश नाईकांना पुन्हा गरूडभरारी घेणे शक्य होणार आहे. महापालिका पुन्हा ताब्यात आल्यावर गणेश नाईकांना वारू रोखणे त्यांच्या विरोधकांनाही शक्य होणार नाही. ऐरोली मतदारसंघातील यशापयशावर बोनकोडेकरांचेही आगामी भवितव्य निश्चित होणार आहे. प्रभाग पुर्नरचनेत बेलापुरच्या तुलनेत अधिकाधिक प्रभाग ऐरोली मतदारसंघात गेले आहेत. संदीप नाईकांना आता आपला जनाधार, प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. शिवसेनेत सध्या फाटाफूट सुरू आहे. स्थानिक भागातील मातब्बर आपल्या ९ समर्थक नगरसेवकांसह भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. वैभव नाईक जरी युवकांच्या गळ्यातील ताईत असले तरी ग्रासरूटला त्यांची पाळेमुळे अजून खोलवर रूजली नाहीत. ऐरोली मतदारसंघातील पालिका यशापयशावर संदीप नाईकांची नाही तर गणेश नाईकांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, याची दस्तरखुद्द संदीप नाईकांनाही जाणिव असणार.