* नामदेव भगत यांची कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव
* आग विझविण्यात नामदेव भगतांचा पुढाकार
संजय बोरकर
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 12 मधील गांवदेवी मैदानावर भरलेल्या कोकण महोत्सवात एका दुकानाला विद्युत वायरीमध्ये बिघाड होवून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक निर्माण झालेल्या प्रचंड धुरामुळे महोत्सवात सहभागी व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली. नेरूळ गावचे ग्रामस्थ व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी आग लागल्यावर काही सेंकदातच घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यात पुढाकार घेतला व भयभीत व्यावसायिकांना दिलासा देण्याचे काम केले.
मंगळवार, दि. 3 मार्च रोजी आई वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेरूळवासियांकरता सिडकोचे माजी संचालक व नेरूळ गावचे ग्रामस्थ नामदेव भगत यांनी श्री. सत्यनारायणाच्या महापुजेचे व स्नेहभोजनाचे आयोजन केले असल्याने सोमवारी रात्री ते उशिरापर्यत नेरूळगावातील गांवदेवी मैदानावर तयारीची पाहणी करत होते. पाहणी झाल्यावर एनआरभगत स्कूलच्या प्रागंणात काही युवा सेनेचे कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी आल्याने ते शाळेच्या समोरील रस्त्यावर चर्चा करत होते. मैदानात कोकण महोत्सवची समाप्ती झाली असल्याने त्यांची सामानाची आवाराआवर सुरू होती. अचानक कार्यकर्त्यांशी बोलताना नामदेव भगत यांचे लक्ष कोकण महोत्सवातील एका दुकानाच्या वर धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम त्या दुकानामधील व आजूबाजूच्या दुकानामधील गॅस सिलेंडर हटविण्याचे निर्देश दिले. एकाने वायरींग गुंडाळली. काही जणांनी पाणी टाकून जळणारे कापड विझविले. अवघ्या चार-पाच मिनिटाचा हा प्रकार असला तरी कपड्याने पेट घेतल्याने धुर सर्वत्र पसरला. मोठी आग लागल्याचा संशय सभोवतालच्या बघ्यांमध्ये निर्माण झाला. नामदेव भगत यांनी घटनास्थळी तात्काळ सूत्रे हातात घेत आग विझविल्याने मोठी हानी टळली. दोन-तीन मिनिटाचा विलंब झाला असता तर कोकण महोत्सवामधील सर्व दुकानांना आगीची झळ बसली असती. उपस्थित व्यावसायिकांनी नामदेव भगत यांचे आभार मानले.
यावर नामदेव भगत यांनी माझे आभार मानू नका. मी माझे कर्तव्यच केले. मी सर्वप्रथम नेरूळ गावचा ग्रामस्थ आहे.माझ्या ग्रामदेवतेच्या पटांगणात तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये हे माझे काम असल्याने मी धावपळ केली आहे. गांवदेवी मातेची आपणावर कृप्पा असल्याने दुर्घटना टळली असल्याचे नामदेव भगत यांनी उपस्थितांना सांगितले.