नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीची जय्यत तयारी सर्वच पक्षांनी व संघटनांनी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार हे 7 मार्च रोजी कोपरखैरणेत येत असूनकोपरखैराणेतील रा.फ.नाईक शाळेच्या क्रिडांगणावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका प्रचाराचाही नारळही त्याचदिवशी फुटणार आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्याबाबत राजकीय वर्तुळात मधल्या काळात निर्माण झालेल्या चर्चांबाबत शरद पवार काय बोलतात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सध्या नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. महापालिकेची गतनिवडणूक व आताची निवडणूक यामध्ये राजकीय स्थित्यंतर मोठ्या प्रमाणावर झालेले असल्याने सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 111 सदस्य संख्या असणार्या आगामी सभागृहात बहूमतासाठी 56 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराम पाटील, अनिता पाटील, किशोर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीत लोकनेते गणेश नाईकांना भाजपाच्या सौ. मंदा म्हात्रेंकडून पराभूत व्हावे लागले. लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 47 हजारांनी नवी मुंबईत पिछाडीवर रहावे लागले होते. त्यातच शिवसेना-भाजपाच्या राजकीय ताकदीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. विजय चौगुले भाजपामय होण्याची शक्यता असल्याने आमदार सौ. मंदा म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक यांच्या पर्यायाने ताकदीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकनेते गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अन्य पर्यायाचा स्वीकार करावा असा टाहो पावणे दोन महिन्यापूर्वी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात काही नगरसेवकांनी उघडपणे फोडला होता. या नगरसेवकांना शरद पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट देणार का, याकडेही नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. गतआठवड्यात गणेश नाईकांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावरच वाटचाल करणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्याबाबत निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला असला तरी शरद पवार याबाबत भाषणातून काय भाष्य करतात, याकडेही नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहीले आहे.