नवी मुंबई : महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर आलेली असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई वर्तुळात कमालीची शांतता आहे. निवडणूक लढविण्याबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साही असतानाही वरिष्ठांकडून निवडणूक लढविण्याबाबत कोणताही संदेश अद्यापि मिळत नसल्याने मनसैनिक संभ्रमावस्थेत पहावयास मिळत आहे.
नवी मुंंबईच्या राजकीय वर्तुळात मनसेला आता अस्तित्वासाठीच संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर नवी मुंबई कार्यक्षेत्रात मनसेचा घटता जनाधार, पक्षातील गळती हा नवी मुंबई मनसेकरांकरीता चिंतनाचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणूकीत नवी मुंबईतून मनसेला फारसे मतदान झाले नाही. विधानसभा निवडणूकीत नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघातून मनसेला नऊ हजाराचाही टप्पा ओंलाडता आलेला नाही. त्यातच अलिकडच्या महिनाभरात मनसेचा नवी मुंबईतील सांस्कृतिक विभाग विलास चव्हाणांचा अपवाद वगळता पूर्णपणे शिवसेनामय झालेला पहावयास मिळत आहे. अजूनही मनसेचे काही पदाधिकारी गळाले लागले असल्याचा दावा शिवसेनेत जावूनही मनसेवर प्रेम करणार्या घटकांकडून केला जात आहे.
गतपालिका निवडणूकीत मनसेने 60 जागा लढविल्या होत्या. मनसेला खातेही उघडता आले नाही. यावेळीदेखील मनसेसाठी फारसे आशादायक चित्र नसतानाही मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे संघटनेसाठी दिवसरात्र परिश्रम करत आहेत. संघटनेत असलेल्या युवकांचे मनोबल वाढवून नवा जोश निर्माण करताना पहावयास मिळत आहेत. इतर पक्षांकडून इच्छूकांचे निवडणूक अर्ज वितरण सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षसुप्रिमो शरद पवारांची लवकरच कोपरखैराणेत सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूका जवळ येवूनही मनसे कार्यालयात आल्यावर इतना सन्नाटा क्य है भाई असा प्रश्न मनसैनिक एकमेकांना खासगीत विचारताना पहावयास मिळत आहेत.
मनसेचे कार्यकर्त्यांनी काही जागांवर निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. व्यक्तिगत जनसंपर्कावर भर देत कार्यालयेदेखील उघडली आहेत. तथापि दादरच्या राजगडावरून कोणताही आदेश न आल्याने मनसैनिक संभ्रमात पडले आहेत.