नवी मुंबई : अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम नवी मुंबईत जोरदार उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे एम.के.मढवी आणि विनया मढवी या दोन नगरसेवकांनी आज शिवसेनासुप्रिमो उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणार्या नगरसेवकांची संख्या आता पाचवर गेली आहे. यापूर्वी काही दिवस अगोदर शिवराम पाटील, अनिता पाटील, किशोर पाटकर या तीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एम.के.मढवी यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकनेते गणेश नाईक यांचे कडवट व निकटवर्तीय समर्थक म्हणून नवी मुंबईत एम.के. मढवी यांना ओळखले जात आहे.
काही दिवसापूर्वीच लोकनेते गणेश नाईक यांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी भावे नाट्यगृहातील प्रेक्षागृहात सर्वाधिक संख्या ऐरोलीतील एम.के.मढवी समर्थकांचीच होती. पत्रकारांच्या मागील रांगेत एम.के.मढवी आपल्या बहूसंख्य कार्यकर्त्यांसमवेत बसल्याचे पत्रकारांना जवळून पहावयास मिळाले होते. एम.के.मढवी यांच्या शिवसेना प्रवेशाच्यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे उपस्थित होते.
एम.के.मढवी यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात उघडपणे कोणीही काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून 15 नगरसेवक शिवसेना प्रवेशाकरीता संपर्कात असल्याचे शिवसेना वर्तुळातून सांगण्यात येत आहे.