नवी मुंबई : स्वाईन फ्ल्यू या साथीच्या रोगाची साथ लक्षात येता रूग्णांवर उपचार करणार्या नवी मुंबई महापालिकेतील आरोग्य कर्मचार्यांना पालिका प्रशासनाने मोफत लस उपलब्ध करून देण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, महापालिका प्रशासनाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांना लेखी निवेदन सादर करताना नामदेव भगत यांनी आरोग्य कर्मचार्यांनाच सर्वप्रथम प्रतिबंधात्मक लस देण्याची मागणी केली आहे.
राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीचा प्रसार भयावह होत असून नवी मुंबई कार्यक्षेत्रात साथीच्या आजारांचा उद्रेक ही बाब नवीन नाही. नवी मुंबई शहराची निर्मिती ही खाडीकिनारीच झालेली असल्याने या ठिकाणी डासांची घनता नेहमीच वाढीस लागलेली असते. मलेरिया, ताप, हिवताप, डेंग्यू या साथीच्या आजारांबरोबर गतकाही वर्षात नवी मुंबईत डेंग्यूचे रूग्णही आढळू लागले आहेत. नवी मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य कर्मचारी व आरोग्य अधिकारी कमी असतानाही आरोग्य सुविधा पुरविण्याची त्यांची कामगिरी खरोखरीच प्रशंसनीय आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागात उपचारासाठी येणार्या रूग्णांना उपचार करता करता वैद्यकीय कर्मचारी व अधिकार्यांना स्वाईन फ्ल्यू वा अन्य साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. धन्वंतरीचे सेवक निरोगी राहणे गरजेचे असल्याने त्यांची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
स्वाईन फ्ल्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागातील नागरी आरोग्य केंद्रे, माता बाल रूग्णालय, फिरता दवाखाना, वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालय आदी ठिकाणी कार्यरत असणार्या वैद्यकीय कर्मचार्यांना, आरोग्य अधिकार्यांना महापालिका प्रशासनाने रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्वाईन फ्ल्यूची लस मोफत उपलब्ध करून द्यावी, देण्याची मागणी नामदेव भगत यांनी केली आहे.
वाईन फ्ल्यू या आजाराचे वाढते गांभीर्य लक्षात घेता उपचार करणार्यांच्या जीविताची आपण काळजी घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक पाऊले उचलताना मागणीचा गांभीर्याने विचार करून त्यावर कार्यवाही कराल, ही अपेक्षा व्यक्त करून नामदेव भगत निवेदनात पुढे म्हणाले की महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी दवाखाने व रूग्णालयाची आपणाकडे नोंद आहेच. स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण त्यांच्यांकडेही उपचारासाठी जात असतात. त्यामुळे त्याही दवाखाना व रूग्णालयातील कर्मचार्यांना स्वाईन फ्ल्यूची लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याचे नामदेव भगत यांनी निवेदनाच्या अखेरीस म्हटले आहे.