संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : उमेदवार पक्षाकडून जाहीर झाले नाहीत, दुसर्या पक्षाचे उमेदवार प्रचार करू लागले आहेत. त्यामुळे उमेदवाराचा प्रचार न करता पक्षाचा प्रचार करण्याची भूमिका घेत नेरूळ सेक्टर ८ मधील शिवसैनिकांनी शिवसेना शाखेत प्रचाराचा नारळ फोडण्याची अनोखी घटना शनिवारी गुढीपाडव्याच्या शुभमूहूर्तावर घडली.
शिवसेना पक्षाकडून इच्छूक उमेदवाराच्या मुलाखती गतरविवारी वाशीमध्ये घेण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उमेदवार जवळजवळ निश्चितच झाल्याचे गृहीत धरून संबंधित उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केल्याचे प्रभागाप्रभागात पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर आठ परिसरातील प्रभाग ८७ (पूर्वीचा प्रभाग ७०) मधील शिवसैनिकांनी उमेदवार जाहीर झाला नसला तरी महापालिका निवडणूकीकरता शिवसेनेचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली. त्याकरता गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडला.
नेरूळ सेक्टर आठ परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सौ. लोखंडे आणि भाजपाकडून सौ. वैशाली तिडके यांची उमेदवारी निश्चित झाल्यातच जमा असल्याने त्यांच्याकडून विभागात प्रचार अभियान गतीमान झाले आहे. नेरूळ सेक्टर आठ परिसरात शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांच्या पत्नी सौ. सुनिता रतन मांडवे, महिला शाखासंघठक सौ. गीता निगडे, सौ. ढमाले, सेक्टर १०चे शाखाप्रमुख दिपक शिंदे यांच्या कन्येसह अन्य काही महिला इच्छूक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी उमेदवार कधीही शिवसेनेकडून जाहीर झाला तरी चालेल, पण आपण शिवसेनेच्या प्रचाराला सुरूवात करायची आणि आजचा गुढीपाडव्याचा शुभमूहूर्त चुकवायचा नाही या हेतूने शिवसैनिक सांयकाळी ७ वाजता शिवसेना शाखेत जमा झाले. उमेदवाराचा नाही तर विभागामध्ये पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडायचा या हेतूने शिवसेना शाखेत शाखाप्रमुख, नगरसेवक, उपशाखाप्रमुख, युवा सेनाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा होत गेले. अवघ्या महिन्यावर आलेली महापालिका निवडणूक आणि विरोधकांनी प्रचारात घेतलेली आघाढी यापार्श्वभूमीवर स्थानिक परिसराकरता शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ शिवसैनिकांनी फोडला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना शाखाप्रमुख बाळू घनवट, नगरसेवक रतन नामदेव मांडवे, सौ. सुनिता रतन मांडवे, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ बोबडे यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. उमेदवार जाहीर नसताना पक्षाच्या प्रचाराचा फोडलेला नारळ ही घटना शिवसैनिकांना प्रोत्साहीत करणारी असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरू आहे.