संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : निवडणूका जवळ आल्यावर पक्षीय पदाधिकारी, नगरसेवकांचे आयाराम-गयाराम पर्व जोरदारपणे सुरू होते. पण नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कधी नव्हे ते नवी मुंबईत प्रथमच राष्ट्रवादी कॉंगे्रसला पर्यायाने लोकनेते गणेश नाईकांच्या गढीला खिंडार पडल्याने नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अग्निदिव्याचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या पहिल्या सभागृहात शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. पण गणेश नाईकांनी शिवसेना सोडल्यावर आजतागायत शिवसेनेला नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेला सत्ता मिळविणे शक्य झाले नाही. महापालिकेच्या दुसर्या व तिसर्या सभागृहात तर शिवसेनेला साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. चौथ्या सभागृहात कॉंगे्रसपेक्षा एक नगरसेवक अधिक निवडून आल्याने शिवसेनेच्या पदरात विरोधी पक्षनेतेपद पडले. दुसर्या सभागृहात अस्थिर राजकीय परिस्थितीत कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदीचा फायदा उचलत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाच वर्षे महापौरपद कायम राखले. तिसर्या व चौथ्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट बहूमत मिळवित एकहाती सत्ता राखली.
एप्रिल २०१४च्या लोकसभा निवडणूकीनंतर नवी मुंबईतील राजकीय समीकरणात लक्षणीय बदल होत गेला. या निवडणूकीनंतरच नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने लोकनेते गणेश नाईकांच्या एकहाती राजकीय वर्चस्वाला तडे बसण्यास सुरूवात झाली. ते तडे आजही कमी झालेले नाहीत.
लोकसभा निवडणूकीत २ लाख ८४ हजार मतांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व तत्कालीन खासदार संजीव नाईक यांना मोदी लाटेमुळे दणदणीत पराभव झाला. पराभवापेक्षाही नवी मुंबईच्या दोन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला तब्बल ४७ हजारापेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर जावे लागले याचे शल्य गणेश नाईक समर्थकांच्या जिव्हारी लागले. नवी मुंबईसारखा राजकीय बालेकिल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने लोकनेते गणेश नाईकांच्या हातातून निसटत असल्याची संकेत स्पष्टपणे दिसू लागले. विधानसभा निवडणूकीत बेलापुर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून लोकनेते गणेश नाईक पराभूत व्हावे लागले. या वादळातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापि सावरली नसल्याचे पहावयास मिळत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आमदार संदीप नाईक यांनी साडेआठ हजारापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवित आपला गढ कायम राखला असला तरी नवी मुंबई महापालिका निवडणूकीत त्यांना शिवसेनेच्या विजय चौगुलेंचा, भाजपाच्या वैभव नाईकांचा पुन्हा एकवार कडवट सामना करावा लागणार आहे. यावेळी शिवसेना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीला सामोरे जाणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला यापुढील वाटचाल आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तब्बल आठ नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा देत नवीन ठिकाणी घरोबा केला आहे. शिवराम पाटील, अनिता पाटील, एम.के.मढवी, विनया मढवी, किशोर पाटकर, कविता जाधव, नारायण पाटील या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाशी सेक्टर १७ मधील संपत शेवाळे या नगरसेवकाने भाजपामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण मंडळ माजी सदस्य प्रशांत पाटील, देविदास सुतार यांच्यासारखे अनेक त्या त्या भागातील राजकीय मातब्बर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून नवीन ठिकाणी घरोबा करू लागले आहेत.
पोलीस गोपाळ सैंदाणे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी मुक्तार अन्सारीप्रकरणी लोकनेे गणेश नाईकांनी प्रतिमा मलीन झाली होती. तोच मुक्तार अन्सारी आता नवीन राजकीय छावणी शोधू लागला आहे.
राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या काही नगरसेवकांनी गणेश नाईकांच्या मागेपुढे फिरायचे व स्थानिक भागात आपणच सहा-सात महापालिका प्रभागातील पक्षाचे सुप्रिमो असल्याचे चित्र निर्माण केल्याने काही ठिकाणी आजही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखदत असल्याचे पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लोकनेते गणेश नाईकांचे कडवट अनुयायी असल्याचे चित्र निर्माण करून स्थानिक भागात संस्थानिक निर्माण झाल्याने त्या त्या ठिकाणच्या सहा ते सात प्रभागातील स्थानिक पदाधिकार्यांकडून, कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर आळविला जावू लागला आहे. तिकीट वाटपावरून अजून काहीजण राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे शिवसेनेला प्राप्त झालेली नव्याने बळकटी, परप्रातिंय व अमराठी मतदारांची अद्यापि भाजपाकडे असलेला झुकाव या पार्श्वभूमीवर खिंडार पडत चाललेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची डागडूजी करून महापालिका निवडणूकांना सामोरे जाण्याची किमया लोकनेते गणेश नाईकांना करून दाखवावी लागणार आहे.