मुंबई : राज्य सरकारमध्ये युती करूनही एकमेकांची उणी-दुणी काढण्यात आघाडीवर असलेल्या सत्ताधारी शिवसेना-भाजपचं महापालिका निवडणुकीसाठी मात्र सूत जुळलं आहे. नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढवणार आहे. जागावाटपाचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.
शिवसेना-भाजपने महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं आवाहन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्याला भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज मातोश्रीवर दाखल झाले. महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत रावसाहेब दानवे आणि उद्धव ठाकरे यांच्या बराच वेळ बैठक चालली. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. जागावाटपाचा निर्णय योग्यवेळी घेऊ, असं दानवे यांनी बैठकीनंतर सांगितलं.