आ.संदीप नाईक यांच्या तारांकित प्रश्नाला शासनाचे उत्तर
नवी मुंबई : विविध प्रयोजनांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी कोकण भवनच्या विभागीय कार्यालयात सादर करण्यात आलेले हजारो अर्ज प्रलंबित असल्याचे बुधवारी राज्य सरकारने कबूल केले. राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ऐरोली विधानसभा क्षेत्रातील आमदार संदीप नाईक यांनी या गंभीर प्रश्नी तारांकीत प्रश्न विचारला होता. त्यावर लेखी उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत ही कबुली दिली. तसेच ही कामे युध्दपातळीवर करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात सांगितले.
कोकण भवन विभागीय कार्यालयात जात पडताळणीची हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब जानेवारी २०१५मध्ये निदर्शनास आली आहे काय? अशी विचारणा आमदार नाईक यांनी केली. या कार्यालयात कर्मचार्यांची कमतरता असल्याने जात पडताळणी अजारचा निपटारा होत नसल्याचे आमदार नाईक यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार नाईक यांच्या या मतावर मंत्री बडोले यांनी सहमती दर्शविली. जाती दाव्यांच्या काही प्रकरणांमध्ये अपुरी कागदपत्रे आणि अपुरे पुरावे असल्याने ही प्रकरणे प्रलंबित आहेत. शंकास्पद प्रकरणांमध्ये पोलीस दक्षता पथकाकडून तपासणी केली जाते. त्यामुळे अशी प्रकरणे प्रलंबित असल्याची मंत्री बडोले यांनी सांगितले. जात पडताळणी प्रमाणपत्रांसहीत इतर कागदपत्रे नसल्याने शिष्यवृत्तीचे काही अर्ज महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित असल्याचे मंत्री बडोले यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. प्रलंबित प्रकरणांची संख्या आणि अपुरा कर्मचारीवर्ग यांचा समन्वय साधून तसेच अतिरिक्त कर्मचारी देवून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा युध्दपातळीवर करण्यात येत असल्याची माहिती बडोले यांनी लेखी उत्तरात दिली आहे.