स्वत: राष्ट्रपती घरी जाऊन देणार पुरस्कार
नवी दिल्ली : त्यांची उंची, त्यांची प्रतिमा मोठी आहे. एवढी मोठी की देशाचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मानही त्यांच्या घरी जाण्यास तयार आहे. अटलबिहारी वाजपेयी. काल के कपाल पर लिखने-मिटानेअशी दुर्दम्य इच्छा असलेले भारतीय राजकारणातील व्यक्तिमत्त्व. इरादे होते पत्थर की छाती पर नए अंकुर उगवण्याचे. त्यांनी देशाच्या राजकारणाला नवी दिशा देऊन (स्थिर आघाडी सरकार) ते करूनही दाखवले. अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असणार्या वाजपेयींना भारतरत्न देण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी स्वत: दिल्लीतील त्यांच्या के-6 कृष्ण मेनन मार्गावरील घरी जातील.
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रीही जातील. सर्व प्रोटोकॉल मोडले जातील. पण त्याचे आश्चर्य वाटणार नाही. कारण ज्यांच्या भाषणातील पॉजही लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न तमाम भारतीय करत असत अशा व्यक्तीसाठी हे होणार आहे. राष्ट्रपती भवनाचे प्रवक्ता वेणू राजामणींच्या मते, हे प्रकरण माजी पंतप्रधानांना सर्वोच्च पुरस्कार देण्याचे आहे. आजारी असल्याने त्यांनी स्वत: येऊन पुरस्कार स्वीकारावा अशी अपेक्षा करता येणार नाही. प्रोटोकॉल दगडावरील रेघ नसते, अशी प्रतिक्रिया अन्य अधिकार्याने दिली.