मुंबई – मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे हे महापौरांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्याच्या शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे अशा शब्दात कॉंग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुंबईसारख्या बड्या शहराचा शिवसेनेला अभ्यास नाही. महापौरच टक्केवारीची भाषा करत आहेत. सर्वांनी टक्केवारीतून तुंबड्या भरून घेतल्या आहेत व यामागे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेब जसे प्रामाणिक होते, तसे तसे उद्धव ठाकरे नाहीत असा घणाघातही त्यांनी चढवला.
कॉंग्रेस नेते आणि वांद्रे पूर्व मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे हे सध्या मतदारसंघात घरोघरी प्रचार करीत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, शिवसेना हा पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही. बाळासाहेबांनी या पक्षाला कष्टाने वाढवले, मात्र आता या पक्षात पैसे देऊन तिकीटे दिली जातात व विकली जातात. त्यामुळे आता हा पक्ष समाज कार्यसाठीचा राहिलेला नाही. शिवसेनेचे नेतृत्त्व नेत्यांकडून पैसे घेतल्याशिवाय तिकीटे देत नाहीत. अनेक नेते कर्ज काढून तिकीटं घेतात. ज्यांच्या पक्षात तिकिटासाठी पैसे घेतले जातात, त्या पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार, असा सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केला. मी केलेला दावा खोटा आहे असे शिवसेनेने सांगावे मी लगेच ५० लोकांची यादी जाहीर करतो असे आवाहनही राणेंनी यावेळी केले.
दरम्यान, एमआयएमचे नेते व आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली असली तरी त्यांनी एमआयएमबाबत भाष्य करणे टाळले. त्याचवेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला. नारायण राणेंचा या पोटनिवडणुकीत दारूण पराभव होईल व त्यानंतर ते भाजपात जातील असे भाकीत ओवेसी यांनी वर्तवले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत, कॉंग्रेसकडून नारायण राणे आणि एमआयएमकडून सिराज खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.