संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : एकदा निवडून गेलेल्या पक्षाचा उमेदवार दुसर्या निवडणूकीत विजयी होत नाही अशी ख्याती असलेल्या नेरूळ सेक्टर ८ परिसराचे राजकीय समीकरण बदलण्यास सौ. सुनिता रतन मांडवे उत्सुक असून शिवसेनेचा गड आपण कायम राखणारच असा विश्वास उमेदवारी अर्ज भरल्यावर ‘नवी मुंबई लाईव्ह.कॉम’शी बोलताना व्यक्त केला.
नेरूळ सेक्टर ८ परिसरातून महापालिकेच्या प्रथम निवडणूकीत शिवसेनेचे नंदू चव्हाण विजयी झाले होते. महापालिकेच्या दुसर्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नारायण पाटील येथून विजयी झाले होते. महापालिकेच्या तिसर्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या सौ. वैशाली तिडके विजयी झाल्या होत्या. महापालिकेच्या चौथ्या निवडणूकीत शिवसेनेचे रतन नामदेव मांडवे विजयी झाले होते. आता महापालिकेच्या पाचव्या निवडणूकीत शिवसेनेकडून सौ. सुनिता रतन मांडवे, राष्ट्रवादीकडून सौ. ज्योती लोखंडे या निवडणूक लढवित असून शेकाप व अपक्षांनीही येथून उमेेवारी अर्ज दाखल केले आहेत.
साधी रहाणी व जनताभिमुख कार्यप्रणाली या स्वभावामुळे नेरूळ सेक्टर आठ परिसर हा रतन नामदेव मांडवेंचा राजकारणात बालेकिल्ला गणला जावू लागला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत या प्रभागातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले होते. नेरूळ सेक्टर आठमधील दोन उद्यानांचा मांडवेंनी केलेला कायापालट जनतेसाठी प्रशंसेचा विषय बनला आहे. प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेकडून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. तथापि पेव्हर ब्लॉकच्या बाबतीत महापालिकेने धोरणात्मक बदल केल्यावर प्रभागातील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये विकासकामांमध्ये कोठेही असमानता राहू नये यासाठी नगरसेवक रतन मांडवेंनी स्वत:च्या खिशातून प्रभागातील चार गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून दिले. मल:निस्सारण वाहिन्या व जलवाहिन्या बदली करून देणे अशी महापालिकेच्या माध्यमातून विविध कामे करताना प्रभागातील युवकांना रोजगारही उपलब्ध करून देण्यावर मांडवेंनी भर दिला.
प्रभाग पुनर्रचनेत बनलेल्या प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर १०मधील चार सोसायट्यांचा समावेश नव्याने झाला असला तरी मांडवेंचा त्या परिसरातील घरटी जनसंपर्क पाहता सौ. सुनिता रतन मांडवेंना विजयासाठी फारसे अडथळे निर्माण होणार नसल्याचे चित्र आजच निर्माण झाले आहे. मंगळवारी शिवसेनेकडून सौ. सुनिता रतन मांडवे यांचा उमेदवारी अर्ज भरताना स्थानिक भागातील महिला, पुरूष व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नेरूळ पश्चिम भागातील प्रभागांमध्ये ही जागा शिवसेनेच्या हमखास विजयी जागांमधील एक जागा मानली जात आहे.