संजय बोरकर
नवी मुंबई : सारसोळे गाव विकासापासून कोसो मैल लांब आहे. सारसोळे गावाच्या अडीअडचणी व समस्या मला माहिती आहे. सारसोळेतील बेरोजगारी हटविण्यासाठी पहिले ‘रिक्रूटमेंट सेंटर’ सारसोळेतच उघडण्यात येणार आहे. सारसोळे गावाचा विकास ठराविक मुदतीत करण्यात अपयश आले तर सरसोळेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक बामनदेव चरणी आपला राजीनामा सादर करतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांनी केले.
महापालिका प्रभाग ८५ व ८६ या दोन प्रभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा वाहणार्या सुरज पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातच तळ ठोकलेला पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या स्थानिक घटकांनी पक्ष सोडताना या परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस संपवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रभाग ८५ व ८६ची निवडणूक येथील राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची बनल्याचे पहावयास मिळत आहे. सारसोळे गावातील युवा वर्गाने गावातील समस्यांबाबत आणि असुविधांबाबत गुरूवारी सांयकाळी सारसोळेच्या कोळीवाड्यानजिक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत उपस्थित युवा ग्रामस्थांसमोर सुरज पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
आजवर सारसोळे गाव विकासापासून वंचित राहण्याचे कारण म्हणजे आजवर सारसोळेचे नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हाती राहीले असल्याची घणाघाती टीका करत सुरज पाटील पुढे म्हणाले की, सारसोळे गावाचा विकास करण्याऐवजी येथील नेतृत्वाने सातत्याने आगरी-कोळी समाजात फूट पाडून आपला स्वार्थ साधण्याचे काम केले आहे. आगरी-कोळी समाजात गैरसमजाची दरी निर्माण करणार्यांनी सत्ता उपभोगली, मात्र गावाकरता आपले कर्तव्य बजावले नाही. गावात सुविधा देता आल्या नाही, ग्रामस्थांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत, स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. केवळ नवीन इमारती बांधताना व जलवाहिनी जोडताना बिल्डरांना बोलवायचे व आपले काम करून घ्यायचे हेच येथील नेतृत्वाने केले नाही. जे ग्रामस्थ आपले समाधान करणार नाहीत, त्यांच्या इमारतीचे पाणी तोडायचे याशिवाय अन्य कोणतेही काम येथील नेतृत्वाने केले नसल्याची टीका सुरज पाटील यांनी केली.
सारसोळे गावातील बेरोजगारी हटविण्यावर सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार असून ‘रिक्रूटमेंट सेंटर’ची स्थापनाच सारसोळे गावात केली जाणार आहे. सारसोळेचा युवक प्रामाणिक आहे, कोणतेही कष्ट करण्यास त्यास कमीपण वाटत नाही. गावातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे यालाच आपण प्राधान्य देणार आहोत. बामनदेवाचा मार्ग, जेटीवरील हायमस्ट, जेटीची दुर्रावस्था, गावातील गटारे, तुटलेले पदपथ, अर्धवट अवस्थेतील मल:निस्सारण वाहिन्या आदी सर्व समस्यांचे लवकर निवारण झालेले पहावयास मिळेल. दर महिन्याला ग्रामस्थांची व नगरसेवकाची सारसोळेत संयुक्त ग्रामसभा आयोजित करून त्यात एक महिन्यात झालेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. सारसोळे गाव विकासापासून पिछाडीवर आहे. ठराविक मुदतीत आम्हाला सारसोळे गावाचा विकास करायचा आहे. या मुदतीत सारसोळे गावाचा विकास करताना आम्हाला अपयश आले तर बामनदेवाच्या चरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक राजीनामा देतील, अशी ग्वाही सारसोळेच्या युवा ग्रामस्थांसमोर बोलताना सुरज पाटील यांनी दिली.
सारसोळे गावातील युवा ग्रामस्थ व कोलवानी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी गेल्या काही वर्षात सारसोळे गावाच्या विकासाकरता करत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा केली. हे परिश्रम वाया जाणार नसून ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास लवकरच पहावयास मिळणार असल्याचे सुरज पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला भालचंद्र मढवी, मनोज मेहेर, तुकाराम टाव्हरे, अशोक आतकरी, महादेव पवार, यशवंत तांडेल, विरेंद्र लगाडे, नरेंद्र मेहेर यांच्यासह सारसोळे गावातील युवा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.