संजय बोरकर
नवी मुंबई :- महानगरपालिका निवडणूकांकरीता मतदानाला आता जेमतेम 15 दिवसाचाच कालावधी शिल्लक राहीला असून नेरूळ गावामधील शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या 1995 साली झालेल्या निवडणूकीमध्ये सर्वप्रथम शिवसेनेचे उमेदवार गोपीनाथ ठाकूर विजयी झाले होते. त्यानंतर 15 वर्षे शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. यंदा नेरूळ गावामध्ये असलेल्या दोन प्रभागातून नामदेव भगत व सौ. इंदूमती भगत हे मातब्बर उमेदवार शिवसेनेच्यावतीने निवडणूक रिंगणात उतरल्याने नेरूळ गावावर तब्बल 15 वर्षानंतर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांकडून उघडपणे बोलून दाखविला जात आहे.
महापालिका प्रभाग 93 व 95 मध्ये नेरूळ गावाचा समावेश होत असून शिवसेनेकडून प्रभाग 93 मधून नेरूळ गावचे सुपुत्र व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत तर प्रभाग 95 मधून नेरूळ गावातून सलग तीन वेळा नगरसेविका बनलेल्या नेरूळ गावच्याच कन्या व नेरूळ गावच्या सुनबाई सौ. इंदूमती नामदेव भगत या निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला शेवटच्या क्षणी अखेरच्या दिवशी शिवसेना-भाजपाकडून आयात उमेदवारांला अवलंबून रहावे लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे इतक्या दिवस हक्काचा उमेदवार नसल्याचे उपहासाने नेरूळ गावामध्ये बोलले जावू लागले आहे.
प्रभाग 93 मध्ये शिवसेनेचे नामदेव भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनाजी ठाकूर आणि प्रभाग 95 मध्ये शिवसेनेच्या सौ. इंदूमती नामदेव भगत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गिरीष म्हात्रे यांच्यातच खरी लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे उमेदवार प्रबळ असल्याने नेरूळ गावातील दोन्ही प्रभागातून शिवसेनेचा भगवा फडकण्यास फारसे अडथळे येणार नसल्याचा विश्वास शिवसैनिकांकडून आणि नेरूळ गावच्या ग्रामस्थांकडून उघडपणे व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ गावात शिवसेना वाढविण्यासाठी गिरीश म्हात्रे या युवकाने परिश्रम केले असले तरी आता तोच गिरीश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा असून आता त्याच गिरीशला शिवसेनेच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. गिरीश म्हात्रे हा शिवसेनेचे उमेदवार सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्याविरोधात निवडणूक लढवित असून सौ. इंदूमती भगत या नेरूळ गावातील विद्यमान नगरसेविका आहेत. नेरूळ गावातून त्या सलग तीन वेळा विजयी झाल्या आहेत. नेरूळ गावातील आगरी-कोळी जनसमुदायाचा सौ. इंदूमती भगत यांच्याकडेच कल असल्याचे पहावयास मिळते. सौ. इंदूमती भगत यांचे माहेर आगरी समाजाचे तर सासर कोळी समाजाचे असून गावामध्ये सौ. इंदूमती भगत यांच्याबाबत कमालीचा आदर आहे. गिरीश म्हात्रेंपूर्वी राष्ट्रवादी काँग्र्रेसकडून देवा म्हात्रे या युवकाचे तिकीट निश्चित झाले होते. देवा म्हात्रे गेल्या काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची युवा ब्रिगेडमधील एक शिलेदार म्हणून तसेच महापौर सागर नाईक आणि नगरसेवक सुरज पाटील यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात आहे. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवा म्हात्रेचे तिकीट कापून शेवटच्या क्षणी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या गिरीश म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली. नेरूळ गावातील याबाबतदेखील निरंक पाटील यांची निश्चित असलेली उमेदवारी भाजपातून अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात झालेल्या धनाजी ठाकूर यांनी उमेदवारी देण्यात आली. सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार्या निरंक पाटील व देवा म्हात्रे यांना तिकीट डावलून गिरीश म्हात्रे व धनाजी ठाकूर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँगे्रसच्या वर्तुळात पडद्याआडून नाराजीचे फडघम उमटू लागले आहेत. सुरज पाटील यांच्या उमेदवारीची नेरूळ गावात जोरदार चर्चा होती. सुरज पाटील यांच्यानंतर देवा म्हात्रेंच्या नावाचा उमेदवारीसाठी जोर वाढला. तथापि शेवटच्या क्षणी शिवसेनेतून आलेल्या गिरीश म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली.
धनाजी ठाकूर यांनी काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदार सौ. मंदाताई म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या क्षणी धनाजी ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीट मिळविली. नेरूळ गावाचा समावेश असणार्या प्रभाग 93 व 95 मध्ये अखेरच्या क्षणी प्रवेश करणार्या शिवसेना-भाजपातील मंडळींना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने पडद्याआडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचा लाभ शिवसेना उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. सुरज पाटील यांच्या उमेदवारीचे नेरूळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटकांनी उत्स्फूर्त स्वागत केले असते. पण आता शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविणार्या उमेदवारांना शिवसेनेच्या विरोधात प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्र्रेसमधील अंर्तगत नाराजीचाही सामना करावा लागणार आहे.
नामदेव भगत यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात मारलेल्या गरूडभरारीचा नेरूळमधील आगरी-कोळी जनसमुदायामध्ये आदराने उल्लेख केला जात आहे. आगरी-कोळी भवनाची निर्मिती, आगरी-कोळी महोत्सवाचे गेली अनेक वर्षे यशस्वी आयोजन, सिडको संचालक पदावरून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला पुढाकार, शिक्षण संस्था स्थापन करून गोरगरीबांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यतचे अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेले शिक्षण यामुळे नामदेव भगत यांची कामगिरी उजवी ठरत आहे.