संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिका निवडणूकीच्या मतदानाकरता अवघा २० दिवसाचा कालावधी शिल्लक राहीलेला असलेल्या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मातब्बर इच्छूक उमेदवारांनी आपली प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा आणि कुकशेत गावातील मतदारांशी सुसंवाद साधण्यासाठी स्थानिक मातब्बरांनी पथनाट्याचा आधार घेतलेला पहावयास मिळत आहे. पथनाट्याच्या माध्यमातून कुकशेत गावचे नगरसेवक सुरज पाटील यांच्या कामाची मतदारांना माहिती करून दिली जात असल्याने जनसामान्यांमध्ये पथनाट्याच्या प्रचाराचे आकर्षण वाढीस लागले आहे.
प्रभाग ८५ हा महिला ओबीसीकरता आणि प्रभाग ८६ हा अनुसूचित महिलाकरता आरक्षित झाला असून या दोन्ही प्रभागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पताका फडकवयाचा विडा कुकशेतचे युवा नगरसेवक सुरज पाटील व सहकार्यांनी उचलला आहे. अनुसूचित महिला राखीव या 86 प्रभागाचा विचार करता सारसोळे गावातून ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र मढवी, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष यशवंत तांडेल तर सेक्टर सहामधून अशोक आतकरी, रमेश म्हस्के, महादेव पवार, ज्ञानेश्वर विश्वासराव आदी मंडळींच्या माध्यमातून सुरज पाटील यांनी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग 85 हा महिला ओबीसी प्रभागाकरता सुरज पाटील यांची पत्नी सौ. सुजाता पाटील या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. सौ. सुजाता पाटील यांनी घरटी जनसंपर्कावर तुर्तास भर दिला आहे. सौ. सुजाता पाटील यांचे शिक्षण एम.कॉमपर्यत झाले असून सुशिक्षित उमेदवार म्हणून युवा वर्गाचा कौल शिक्षणाच्या निकषावर त्यांच्याकडे झुकत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष तुकाराम टाव्हरे यांचीदेखील प्रभाग ८५ मध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सुरज पाटील यांच्याविषयी सारसोळे गावातील व नेरूळ सेक्टर सहामधील युवा वर्गात कमालीचे आकर्षण आहे. कुकशेत गावाचा व नेरूळ सेक्टर दहामधील काही विभागात सुरज पाटील यांची कामे युवा वर्गात चर्चिली जात आहेत. नेरूळ सेक्टर सहामधील युवा वर्ग व सारसोळे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सुरज पाटील यांच्या संपर्कात येवू लागले आहेत.
प्रभाग ८५ व प्रभाग ८६ चा परिसर प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने घरटी जनसंपर्क व पथनाट्याच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून सुरज पाटील यांची विकासकामे सारसोळे गावच्या ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना पटवून दिली जात आहेत. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावाच्या समस्या सोडविण्याकरता व त्या ठिकाणी सुविधा पुरविण्याकरता मनोज मेहेर यांनी प्रशासनदरबारी तब्बल सात हजाराहून अधिक लेखी तक्रारींचा पाऊस आणि केलेला पाठपुरावा व सोडविलेल्या समस्या नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपयुक्त ठरणार आहेत.
पथनाट्य पाहण्यास जमलेली गर्दी ही स्थानिक भागातील मतदारच असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचार अभियानाला धार चढली आहे. मनोज मेहेर यांनी सिडकोच्या शिवम, दत्तगुरू, नेरूळ सिव्ह्यू या गृहनिर्माण सोसायट्यांतील विविध कामांकरीता केलेला पाठपुरावा आता प्रचाराच्या दुसर्या टप्प्यात वापरला जाण्याची शक्यता असून मनोज मेहेरच्या लेखी तक्रारी व केलेली कामे हीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकरता उपयुक्त ठरणार आहेत. येत्या दोन दिवसात युवा फळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.