मुंबई /प्रतिनिधी
मुंबई, ठाण्यात राहत असलेल्या कोकणवासीयाना गावी जाण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार खासदार राजन विचारे यानी मागणी केल्यानंतर एस.टी. महामंडळाने १ एप्रिलपासून बोरीवली-ठाणे-राजापूर ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
कोकणातील प्रवाशांसाठी सुट्टीच्या मोसमात गावी जाण्यासाठी नवीन बससेवेचा चांगला उपयोग होणार आहे. बोरीवलीहून घोडबंदर रोडने ठाणे खोपट आगार येथून बेलापूर रस्त्याने पनवेल, पेण गोवा रस्त्याने सदर बस धावणार आहे. सदर बस रोज सायंकाळी ७ वाजता सुटून पहाटे ५ पर्यंत राजापूर येथे पोहचेल, परतीसाठी रोज सायंकाळी ५:३० वाजता राजापूर येथून सुटेल. सदर एस.टी. बसचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. सदर बसचे थांबे काशिमिरा पोलीस स्टेशन शिवाजी चौक काशिमिरा, कासारवडवली घोडबंदर रोड, खोपट मध्यवर्ती एस.टी. स्टँड, रबाळे पोलीस स्टेशन, नेरूळ मार्गे ही निमआराम बससेवा असून प्रवाशांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती एसटी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.