शिवसेनेचे नामदेव भगत कंत्राटी कामगारांसाठी सक्रिय
संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनातील विविध खात्यात काम करणार्या कंत्राटी कामगारांची यादी त्यांच्या पीएफ क्रमांकासह महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची लेखी मागणी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व प्रशासन उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका आस्थापनेत काम करणार्या कंत्राटी कामगारांची संख्या कायम कामगारांच्या दुप्पटीच्या जवळपास आहे. नवी मुंबई शहराला गेल्या काही दशकापासून कंत्राटी या शब्दाचा शाप लागलेला आहे. नवी मुंबईचा कारभार हा ग्रामपंचायतीकडून सिडकोकडे व त्यानंतर सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरीत झाला आहे. या हस्तांतरण प्रक्रियेत कंत्राटी कामगारही हस्तांतरीत होत गेले. कंत्राटी कामगारांची सेवा काही आजतागायत कायम झालेली नाही. नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांची संख्या व त्यांचा पीएफ क्रमांक याबाबत नवी मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटसूलट चर्चा होत असून पालिका प्रशासनातील संबंधित अधिकार्यांसह कामगार संघटना आणि संबंधित ठेकेदारांवरदेखील उलटसूलट गंभीर आरोप जनसामान्यांकडून केले जात आहे. महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून पीएफकरीता ठराविक रक्कम कापली जात असली तरी अधिकांश कंत्राटी कामगारांना त्यांचा पीएफ क्रमांकच माहिती नसल्याने कापला गेलेला पीएफ ठेकेदार भरतात अथवा नाही याबाबत कामगारांना काडीमात्र कल्पना नसल्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
महापालिका प्रशासनाने काम करणार्या सर्व कंत्राटी कामगारांची नावे, त्यांची खाती आणि त्यांचा पीएफ क्रमांक याची सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावी, ज्यायोगे नवी मुंबईकरांनादेखील आपल्या विभागाकरीता किती कंत्राटी कामगार उपलब्ध आहेेत याची माहिती उपलब्ध होईल. पीएफ क्रमांक उपलब्ध झाल्यास कंत्राटी कामगारांनाही त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा आहे याची माहिती उपलब्ध होईल. कंत्राटी कामगारांची संख्या व त्यांचा पीएफ क्रमांक हा विषय दिवसेंगणिक वादग्रस्त व नवी मुंबईकरांमध्ये बहूचर्चित विषय होत असल्याने या गंभीर विषयाकडे नगरसेवक नामदेव भगत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
समस्येचे गांंभीर्य लक्षात घेवून महापालिकेच्या प्रशासन विभागाने कंत्राटी कामगार व त्यांचा पीएफ क्रमांक यावर सकारात्मक निर्णय घेवून आपल्या मागणीचा विचार करावा, अशी विनंती करून ज्यायोगे कंत्राटी कामगारांचेही हित साधले जाईल आणि जनसामान्यांत होणारी चर्चा यालाही पूर्णविराम मिळेल. याबाबत आपण काय कार्यवाही केली याची लेखी स्वरूपात माहिती मिळावी अशी मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.