महापालिकेतील नवा चेहरा
संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत अनेक प्रस्थापितांच्या गढी उध्दवस्त झाल्या. अकार्यक्षम व नाकर्त्यां नेतृत्वाला ठिकठिकाणी मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. शिरवणे गाव म्हटले अरूण सुतार व त्याखालोखाल जयवंत सुतार यांचा राजकीय बालेकिल्लाच. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा तेही अरूण सुतार यांच्या मुलाचा पराभव करेल असे भाकीत कोणी ज्योतिषाने निवडणूकीपूर्वी वर्तविले असते तर राजकारणातील हवशागवशानवशांनीदेखील त्याला मुर्खात काढले असते. पण या ठिकाणी इतिहास घडविला तो शिवसेनेच्या शिवसैनिकांनी. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणार्या शिरवणे गावावर अवघ्या ५२ मतांनी निसटता विजय मिळवित शिवसेनेचा भगवा अखेर फडकलाच. ज्ञानेश्वर सुतार हा ४५ वर्षाचा शिवसैनिक नवी मुंबईच्या राजकारणातील महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून नवा जायंट किलर जन्माला आला आहे.
महापालिका निवडणूकीत अनेक रथी-महारथींना पराभूत होण्याची वेळ आली. त्यामध्ये शिरवणे गावाचा निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जयेंद्र अरूण सुतार यांना शिवसेनेच्या ज्ञानेश्वर सुतारांनी ५२ मतांनी पराभूत करून हा राजकीय चमत्कार घडविला आहे. शिरवणे गाव म्हणजे सुतारांचे गाव, त्यातही येथील राजकारणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुतारांचा अलिकडच्या काळात प्रभाव दांडगा होता. त्या प्रभावाला शह देण्याचे काम शिवसेनेच्या सुतारांकडूनही करण्यात येत होते. यावेळच्या निवडणूकीत शिवसेनेच्या सुतारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुतारांना निष्प्रभ करत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे काम केले आहे.
शिरवणेच्या गावातील शिवसेनेच्या इतिहासात डॉ. राजेश पाटील यांनी सुरूवातीच्या काळात परिश्रम केले. डॉ. राजेश पाटलांच्या मुशीतच अविनाश सुतार, ज्ञानेश्वर सुतार, विवेक सुतार यासारखे अनेक शिवसैनिक घडले. डॉ. राजेश पाटील यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला खरा, पण त्यांनी घडविलेल्या शिवसैनिकांनी भगव्यांशी इमान राखत जय महाराष्ट्रचा आवाज शिरवणे गावात जिवंत ठेवला. डॉ. राजेश पाटलांच्यानंतर अविनाश सुतार या युवकांने शिरवणे गावाची धुरा सांभाळत तनमन व मोठ्या प्रमाणावर धन खर्चून विविध सामाजिक उपक्रमातून शिवसेनेला संजीवनी व नावलौकीक देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले.
महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत शिरवणे गावाचा समावेश असणारा प्रभाग ८९ हा पुरूष इतर मागासवर्गिय (ओबीसी)साठी आरक्षित झाला. या प्रभागातून शिरवणे गावातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी काही जणांनी उत्सूकता दर्शविलीदेखील. पण अवीशेठ संागतील तोच उमेदवार व त्यालाच निवडून आणावयाचे हा निर्धार इच्छूकांनीदेखील केला होता. अवीशेठ यांनी सर्व इच्छूकांनी एकत्रित बसून विचारविनिमय करून ज्ञानेश्वर सुतार यांची उमेदवारी निश्चित केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणारा शिरवणे गाव. त्यात अरूण सुतार यांचा मुलगा व विद्यमान नगरसेविका सौ. माधुरी सुतार यांचे यजमान जयेंद्र सुतार यांना उमेदवारी मिळाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विजय राजकीय समीक्षकांनी निश्चित मानला होता. पण नियतीला यंदा शिरवणे गावातून राजकीय चमत्कार घडवायचाच होता.
शिरवणे गावातील शिवसैनिक एकवटले. रात्रीचा दिवस केला. शिवसेेनेने प्रचार अभियानात मुसंडी मारली. आमदार, खासदार, उपनेते, ठाण्याचे महापौर आदी प्रचार अभियानात शिरवणेतील शिवसैनिकांच्या मार्गदर्शनाला धावून गेले. गावातील सुविधा, गावातील बकालपणा, आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असूनही गावाचा न झालेला विकास आदी बाबी शिवसैनिकांनी शिरवणे ग्रामस्थांच्या व अन्य रहीवाशांच्या निदर्शनास आणून दिल्या. शिवसैनिकांच्या परिश्रमाला मतदारांनी दाद दिली. शिवसेनेच्या ज्ञानेश्वर नारायण सुतार यांनी १४६९ मते मिळविली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयेंद्र सुतार यांना १४१७ मते मिळाली. अवघ्या ५२ मतांनी निसटता विजय मिळवित शिरवणे गावावर शिवसैनिकांनी शिवसेनेचा भगवा फडकविता राष्ट्रवादी कॉंग्रेसची येथील राजकीय मक्तेदारीला तुर्तास लगाम घातला आहे.
शिवसेनेचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर नारायण सुतार हे ४५ वर्षीय असून बारावीपर्यत शिक्षण झालेले आहे. कळत्या वयापासून शिवसेना पक्षात केवळ कडवट शिवसैनिक म्हणून आजवर कार्यरत आहेत. शिवशक्ती मंडळ, बालगोपाळ मंडळ, शाम सुरेंद्र मंडळ, एकता मित्र मंडळ आदी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिरवणे गावात २० वर्षे ज्ञानेश्वर सुतार सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. नवरात्रौत्सव मंडळ, गोविंदा पथक, रक्तदान शिबिराचे आयोजन, मोफत वह्या वाटप, मोफत आरोेेग्य शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, क्रिकेट स्पर्धाचे आयोजन आदी कार्यक्रमात सक्रिय योगदानामुळे ज्ञानेश्वर सुतार या शिवसैनिकाचा चेहरा घरटी परिचित झाला होता. अविनाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सुतार यांची सामाजिक व संघटनात्मक वाटचाल सुरू होती.
महापालिका निवडणूकीत शिवसेनेने उमेदवारी ज्ञानेश्वर सुतारांना उमेदवारी दिली. शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करत प्रचार अभियानात जीवाचे रान करत नागरी समस्या व विकास याच एकमेव बाबीचा उहापोह करत मतदारांमध्ये जनजागृती केली. अखेरीला शिवसेनेचा भगवा शिरवणे गावावर फडकलाच.
राजकीय पटलावर चमकणार्या शिरवणे गावात असुविधा आहेत. बकालपणा आहे. गटारे तुंबलेली आहेत. बेरोजगारी आहे. रस्त्यांची दुर्रावस्था आहे. समस्या प्रचंड आहेत. नागरीकांच्या व ग्रामस्थांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर विजयी झालेल्या ज्ञानेश्वर सुतारांना आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणिव असल्याचे त्यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत पहावयास मिळाले. गावामध्ये क्रिडांगण नाही, उद्यान नाही. तथापि ग्रामस्थांनी व अन्य रहीवाशांनी दिलेल्या विश्वासाला आपण तडा जावू देणार नाही व येणार्या तीन – चार वर्षात शिरवणे गावाचा एक विकसित चेहरा पहावयास मिळणार असल्याचा विश्वास ज्ञानेश्वर सुतार यांनी व्यक्त केला आहे.
ज्ञानेश्वर सुतार या शिवसैनिकाच्या कपाळी मतदारांनी मतदानातून तिलक लावला आहे. मतदारांच्या आशा-अपेक्षांची ते कितपत पूर्तता करतात, शिरवणे गावाचा ते कितपत विकास करतात, ते आपणास आगामी काळात पहावयास मिळेलच. तुर्तास शिरवणे गावाचा नवा राजकीय जायंट किलर म्हणून उदयास आलेल्या ज्ञानेश्वर सुतार यांना आगामी वाटचालीसाठी ‘नवी मुंबई लाईव्ह’ या वेबमिडीयाकडून हार्दिक शुभेच्छा!