संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील गटारे-नाल्याची सफाई युध्दपातळीवर हाती घेण्याची लेखी मागणी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्याकडे केली आहे.
आता जेमतेम एक महिन्यावर पावसाळा येवून ठेपलेला आहे. नवीन महापालिकेचे सभागृह 9 मे 2015 ला अस्तित्वात येवून सभागृहाचे कामकाज अस्तित्वात येईल. नवी मुंबई शहराची निर्मिती ही मुळातच खाडीकिनार्यावर तसेच काही ठिकाणी खाडीवर भराव टाकून झालेली आहे. महापालिका प्रशासनाने एक महिन्यावर येणारा पावसाळा लक्षात घेवून पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून गटारे व नालेसफाईची कामे युध्दपातळीवर हाती घेण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.
गतमहिन्यात खाडीला मोठी भरती आल्यामुळे नाल्यातील पाणी वाशी सेक्टर 17 परिसरात घुसल्याचे आपणास माहिती आहेच. नवी मुंबई शहरातील गटारांची लवकरात लवकर तळापासून सफाई करून त्यात अडकलेली माती, तुंबलेला कचरा काढणे आवश्यक आहे. नाल्यातील सफाई करताना त्यातील गाळ काढणे गरजेचे आहे. अनेकदा नाल्यात सफाईसाठी उतरविण्यात आलेले क्रेन मशिन नाल्यातील गाळ व कचरा न काढता तेथेच पांगवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाल्यात वरवर सफाई झाल्याचे दिसते, पण कचरा व गाळ तेथेच साठत असल्याचे दिसून येते. पावसाळ्यात नवी मुंबई जलमय होवू नये याकरता लवकरात लवकर पावसाळीपूर्व कामाचा भाग म्हणून गटारे व नाल्यांची सफाई मोहीम हाती घेण्यात यावी आणि ज्या ठिकाणी गटारांची व नाल्याची सफाई होत असेल त्या ठिकाणी पालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी उपस्थित रहावे. ठेकेदाराने दिलेल्या माहितीवर अवलंबून राहू नये. समस्येचे संभाव्य गांभीर्य लक्षात घेता शक्य तितक्या लवकर आपण नालेसफाईसह गटारांची सफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.