संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उचलबांगडी होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. तटकरेंच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची निवड होणार असून बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ही घोषणा करतील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत वळसेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
वळसे पाटील यांच्याबरोबरच राजेश टोपे, शशिकांत शिंदे व जयंत पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत होती. पण टोपे व शिंदे यांच्याकडे पक्षसंघटना उभारण्याएवढा मोठा अनुभव गाठीशी नसल्याने ही दोन नावे मागे पडली. तर तटकरे व वळसे पाटील या दोघांपैकी एकाच्या नावावर बराच वेळ चर्चा होऊन शेवटी वळसे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
भास्कर जाधव यांना दूर करून दहा महिन्यांपूर्वी तटकरेंना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. चतुरस्र राजकारणी म्हणून त्यांनी छाप पाडली असली तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटन उभे करण्यात ते फारसा प्रभाव टाकू शकलेले नाहीत, असा निष्कर्ष पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी काढला आहे. भविष्यात पक्षाला भाजप- शिवसेेनेच्या मोठ्या आव्हानाचा मुकाबला करायचा असेल तर प्रदेशाध्यक्ष कुशल संघटक असावा, असा पवारांचा आग्रह आहे.
रायगडमधील माणगावच्या सुनील तटकरेंचे अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्याच आग्रहाखातर तटकरेंना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोन नेत्यांमधील संबंधांचा प्रभाव कमी झाला असल्याचे बोलले जाते. शिवाय सिंचन घोटाळ्यात तटकरे अडकल्यास पक्षावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, या सार्याचा विचार होऊन शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर विश्वास टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
वळसे पाटील यांचे नाव निश्चित करताना प्रशासकीय व संसदीय अनुभवाला प्राधान्य देण्यात आले. शिवाय पक्षातील अंतर्गत राजकारण कमी करून संघटन बांधणीला त्यांचा मोठा हातभार लागू शकेल, असे पक्षाला वाटते. गटप्रमुखांची साखळी उभारून पक्षाचा प्रचार-प्रसार करणार्या शिवसेनेच्या संघटनकौशल्याचे शरद पवार यांनी वारंवार कौतुक केले आहे. राष्ट्रवादीतही नेते व पदाधिकार्यांऐवजी थेट लोकांमध्ये मिसळून काम करणार्या कार्यकर्त्यांची टीम असावी, अशी पवारांची इच्छा आहे.