संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महापालिका निवडणूकीनंतर महापालिका सभागृहात पाठीमागच्या दरवाजाने अर्थात स्वीकृत नगरसेवक म्हणून जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. राष्ट्रवादी कॉंग्रेसची कॉंग्रेसच्या मदतीने सत्ता येणार असल्याचे निश्चित असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून जाण्याकरीता अनेक नावांची चर्चा आहे. काही जण आपली नावे चर्चेत येण्यासाठी आपल्या निकटवर्तीयांकडून मोर्चेबांधणीदेखील करू लागले आहेत. लोकनेते गणेश नाईकांची ‘कृप्पादृष्टी’ ज्यावर पडेल, त्याच्याच माथी स्वीकृत नगरसेवकचा तिलक लागेल, हे मात्र निश्चित आहे.
कॉंग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची शक्यता असली तरी कॉंग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक सोडावे लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घटक दोन स्वीकृत नगरसेवक मिळणार असल्याच्या शक्यतेला दुजोरा देत आहेत. अनंत सुतारांचा झालेला पराभव, भरत नखातेंची सभागृहातून एक्झिट, अनुभवी शशिकांत बिराजदारांची कमतरता, कुकशेतचा ढाण्या वाघ सुरज सुतार, करावेचे संदीप सुतार, साबु डॅनियल, शिरवणेतील जयेंद्र सुतार यासह नानाविध नावाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. पत्रकारांना केवळ बातम्यांपुरताच वापर करून घेतला जात असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वीकृत नगरसेवकपदी एकाद्या पत्रकाराची वर्णी लावण्याची मागणी पत्रकार वर्गाकडून देखील करण्यात येवू लागली आहे.