संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई :नवी मुंबई महापालिका निवडणूकानंतर विजयी व पराभूत उमेदेवार निवडणूकीत झालेल्या खर्चांचा अंदाज लावण्यात व्यस्त असतानाच राजकीय पक्षांचे पदाधिकारी परिवहन समिती व शिक्षण समितीचे सदस्यपद पदरात पाडण्याकरीता मोर्चेबांधणी करू लागल्याचे पहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुसंडी मारत सर्वांधिक जागा ५२ जागा मिळवित मुसंडी मारली असली तरी स्पष्ट बहूमताकरीता त्यांचे अवघे ४ संख्याबळ कमी पडले. ३ अपक्षांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसशी घरोब्याचे संबंध असले तरी घोडेबाजार व अस्थिरतेचे कायमस्वरूपी असलेले संकट टाळण्यासाठी लोकनेते गणेश नाईकांनी थेट केंद्रात व राज्यात आपला मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसलाच आघाडीत घेवून पाच वर्षाकरीता उपमहापौर आणि विषय समित्यांचे सभापतीपद देण्याचे मान्य केले. लोकनेेते गणेश नाईकांच्या या सुज्ञ व प्रगल्भ राजकीय खेळीमुळे विरोधकांचे डावपेच धुळीला मिळाले आणि विधानसभेत लोकनेते गणेश नाईकांच्या विरोधात काम करून शिवसेना उमेदवार विजय नाहटांना मदत करणार्या स्थानिक कॉंग्रेसी घटकांबाबत आपल्या मनात कोणताही आकस नसल्याचा संदेश कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वापर्यत नकळत पोहोचविण्यात लोकनेते गणेश नाईक यशस्वी झाले.
९ मे २०१५ ला पाचवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर काही दिवसातच परिवहन व शिक्षण समितीकरता सदस्यनिवड होणार आहे. महापालिका निवडणूकीत केलेल्या परिश्रमाची पोचपावती म्हणून या समित्यांच्या सदस्यपदी आपली वर्णी लागावी अशी महत्वाकांक्षा असंख्य मातब्बर कार्यकर्त्यांनी मनाशी बाळगली आहे.
मातब्बर कार्यकर्त्यांची समजूत काढताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे. निवडणूक काळातील घडामोडीत अन्य पक्षातील पदाधिकार्यांनी व मातब्बर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेलाआहे. त्या कार्यकर्त्यांचे व पदाधिकार्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षसंघटनेत पुनर्वसन करण्यात आलेले नाही. लोकनेते गणेश नाईक आपणास परिवहन वा शिक्षण समिती सदस्य देवून आपला मानसन्मान राखतील अशी अपेक्षा संबंधित घटकांकडून उघडपणे व्यक्त केली जात आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांनीदेखील आपणास परिवहन व शिक्षण समिती न मिळाल्यास किमान प्रभाग समिती सदस्य म्हणून ‘दादां’नी विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.