संदीप खांडगेपाटील : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नवी मुंबईतील नोडमध्ये बांधण्यात येणारी अनधिकृत बांधकामे नियंत्रित करण्यासाठी सिडकोतर्फे अनधिकृत बांधकामाविरुध्द कारवाई करण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत गुरूवारी दि. ३० एप्रिल २०१४ रोजी सिडको महामंडळाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातर्फे नवी मुंबईतील जुई-कामोठे नोडमध्ये धडक कारवाई करून अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
सदर अतिक्रमण कारवाईमध्ये भूखंड क्रमांक २२९ व २३२ वरील बांधकाम निष्कासित करण्यात आले. या भूखंडावर सिडकोच्या कुठल्याही परवानगीशिवाय तसेच विकास परवान्याशिवाय कैतिराज डेव्हलपर्सचे विठू दामा कडू यांनी चार मजली इमारतीचे बांधकाम केले होते. हे बांधकाम सर्वेक्षणामध्ये बेकायदेशीरित्या बांधल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या बांधकामावर योग्य कारवाई करण्याच्या अनुषंगाने भूखंड क्रमांक २२९ व २३२ बांधण्यात आलेल्या ४७४.६० चौ.मी. क्षेत्रफळाच्या प्लिथंचे बांधकाम अंशत: निष्कासित कऱण्यात आले. उर्वरित बांधकामाचे निष्कासन पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच कैतिराज डेव्हलपर्स विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ही अतिक्रमण कारवाई सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे नियंत्रक गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाई दरम्यान २५० पोलिसांनी सहकार्य केले. यामध्ये एसीपी सुर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुल्लेमवार, सिडकोचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पराग सोनावणे, सिडकोचे उप सुरक्षा अधिकारी रावसाहेब सुरवसे, त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी पी. बी. राजपुत, क्षेत्राधिकारी (१)/सहाय्यक विकास अधिकारी (प्रभारी) सुनील चिदचळे व अन्य कर्मचार्यांनी देखील या कारवाईत भाग घेतला. या कारवाईसाठी ७ पोक्लेन्स, २ जेसीबी, २ गॅस कटर्स, ५० कामगार, ३ ट्रक व ६ जीपचा वापर करण्यात आला.