सिंधुदुर्गनगरी : वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक हरणारे काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व मात्र कायम राखले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनलने 19 पैकी 15 जागा जिंकत शिवसेना-भाजप युतीच्या पॅनलचा धुव्वा उडवला. या निकालांनतर राणेंची साथ सोडून भाजपवासी झालेले राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाल्याने कणकवलीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संकल्प सिद्धी आणि शिवसेना-भाजप युतीचे सहकार वैभव पॅनल यांच्यात रस्सीखेच होती. नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्यातच नुकत्याच झालेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राणे यांच्यापुढे जिल्हा बँकेवरील वर्चस्व राखण्याचे आव्हान उभे ठाकले होते. विशेष म्हणजे राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नीतेश राणे यांनी या निवडणुकीच्या प्रचारात उतरतानाच जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. राणेंचे हे श्रम फळाला आले असून या बँकेवर राणेंचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे आज स्पष्ट झाले.
राणेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि सध्याचे भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व असलेल्या राजन तेली यांनी राणेंचा पाडाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही प्रचारात उडी घेतली. मात्र, भाजप-सेनेच्या पॅनलला अवघ्या चार जागांपर्यत मजल मारता आली. पॅनलचे नेतृत्व करणारे राजन तेली तसेच पुष्पसेन सावंत यांना पराभवाचा धक्का बसला