मुंबई : हिट अँड रन प्रकरणी दोषी ठरलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आधार देण्यासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. राज ठाकरे आणि सलमान यांची दोस्ती सुपरिचित असली, तरी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या गुन्हेगाराला एका पक्षप्रमुखानं भेटणं कितपत योग्य आहे, यावरून चर्चेला उधाण आलं आहे.
बॉलिवूड सिनेमात शोभतील अशा अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर, तब्बल 13 वर्षांनी अभिनेता सलमान खानला हिट अँड रन खटल्यात सेशन्स कोर्टाने पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकून बॉलिवूड हळहळलं. बीईंग ह्युमन सल्लू कसा ग्रेट आहे, याची वर्णनं सोशल नेटवर्किंगवर सुरू झाली. इतक्यातच, सल्लूला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्याची बातमी झळकली आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या घराकडे धाव घेतली.
काल संध्याकाळपासून गॅलेक्सीवर जणू तारांगणच अवतरलं आहे. सल्लूला धीर देण्यासाठी सेलिब्रिटींची रांग लागली आहे. बिपाशा बासू, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा, सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, सुनील शेट्टी, सोनू सूद, चंकी पांडे यांनी आपल्या प्रिय मित्राची रात्री भेट घेतली. मध्यरात्रीनंतर, किंग खान शाहरुखनंही सलमानला आधार देण्यासाठी पोहोचला. त्यानंतर, आज आमीर खाननंही त्याचं सांत्वन केलं.
हा सगळा सिलसिला सुरू असताना, दुपारी सव्वाच्या सुमारास राज ठाकरेंची नऊ नंबरची कार गॅलेक्सीपुढे थांबली आणि सगळेच अवाक् झाले. राज कुणाशीही न बोलता थेट इमारतीत शिरले आणि सलमानच्या घरी गेले. या भेटीवरून उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. मैत्रीच्या नात्यानं राज सल्लूच्या भेटीला आल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. ते जरी खरं असलं, तरी या भेटीकडे गुन्हेगार – राजकारणी भेट म्हणूनही पाहिलं जातंय आणि त्यातून वेगळाच संदेश जनमानसांत जाऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. एका गुन्हेगाराला एका राजकीय नेत्यानं आधार देणं धक्कादायक असल्याचंही ते नमूद करतात. कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटायला राज गेले होते का, असा सवालही उपस्थित होतोय.
राज ठाकरेंनी सलमानची भेट घेणं, त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठीही चांगलं नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सलमानला झालेली शिक्षा प्रत्येक सुजाण व्यक्तीला पटणारीच आहे. त्यामुळे राज यांचं वागणं त्यांना खटकू शकतं, याकडे ते लक्ष वेधतात.
दरम्यान, राज-सलमान भेटीमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संजय दत्तची पाठराखण केल्याच्या घटनेला उजाळा मिळाला आहे. त्यावरून बाळासाहेबांवरही बरीच टीका झाली होती, परंतु ठाकरी बाण्यानुसार त्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आता राज ठाकरे आपल्यावरील टीकेबद्दल काय बोलतात, की ठाकरी बाणाच दाखवतात, हे पाहावं लागेल.
राज ठाकरे यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते नारायण राणे यांचे चिरंजीव, आमदार नितेश राणेही सलमानच्या घरी पोहोचले आहेत. त्यामुळे, कायद्याने ज्याला दोषी ठरवलंय, त्या सलमानचा लोकप्रतिनिधींना एवढा पुळका का, असा प्रश्न विचारला जातोय.