संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : अवघा एक महिन्यावर येवून ठेपलेला पावसाळा लक्षात घेवून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळीपूर्व कामे हाती घेण्याची मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली होती. या मागणीवर सकारात्मक हालचाली करत महापालिका प्रशासनाने आठवडाभरातच कामास सुरूवात केल्याचे पहावयास मिळत आहे.
शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी 27 एप्रिल रोजी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि महापालिका शहर अभियंता मोहन डगांवकर यांना लेखी निवेदन सादर करत पावसाळीपूर्व कामांना तात्काळ प्रारंभ करण्याची मागणी केली होती. महिन्यावर पावसाळा येवून ठेपल्याने नालेसफाई व गटारांची तळापासूनची सफाई करण्याची मागणी करत समस्येचे गांभीर्य नामदेव भगत यांनी लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या लेखी मागणीवर तात्काळ सकारात्मकता दाखवित महापालिका प्रशासनाने आठवडाभराच्या आतच कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. 6 मे रोजी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कोणतीही आपत्ती पुर्वसूचना देऊन येत नाही त्यामुळे कायम सतर्क राहण्याची गरज असून नवी मुंबई महानगरपालिकेसह सर्वच यंत्रणा यादृष्टीने सजग असाव्यात याकरीता महापालिका मुख्यालयात पावसाळीपूर्व कालावधीतील कामांचे नियोजन करण्यासाठी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष बैठक बोलविली होती.
या बैठकीत महापालिका आयुक्त तथा शहर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी विविध प्राधिकरणांच्या पावसाळी पूर्वतयारी कामांचा आढावा घेतला. पावसाळी पूर्व नाले-गटारे सफाई कामे 31 मे पूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले तसेच शहरात रस्त्यांवरील नवीन खोदकामे बंद करण्यात आली असून रस्त्यांच्या पुर्नपृष्ठीकरणाची कामेही 31 मे च्या आत पूर्ण करावीत असे त्यांनी निर्देशित केले.
शहर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मागील वर्षीप्रमाणेच दोन आराखडे तयार करावेत असे सूचित करीत पहिल्या आराखड्यात प्रत्येक विभागाच्या जबाबदार्या व त्यांनी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत विस्तृत माहिती असणार आहे. दुसर्या आराखड्यात सर्व संबंधित यंत्रणांचे तसेच सेवाभावी संस्था-व्यक्ती यांचे संपर्कध्वनी क्रमांक शीघ्र संदर्भासाठी उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक प्राधिकरणाने महापालिका व पोलीस यांच्याप्रमाणे पावसाळी कालावधीमध्ये 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापित करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
आपत्तीला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी परस्पर समन्वय व सुसंवाद आवश्यक असून याकरीता सर्वच प्राधिकरणांनी परस्पर संपर्कात राहण्याची गरज व्यक्त करीत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सध्याच्या माध्यम युगाला साजेशा एसएमएस, एफएम चॅनेल, सोशल मिडीया, होर्डिंग्ज, पॅम्प्लेटस् अशा विविध साधनांतून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळी कालावधीत होणार्या जलजन्य/साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला असून पावसाळी कालावधीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मोठया प्रमाणावर प्रचार व प्रसार करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. होल्डिंग पॉडस् चे फ्लॅपगेट दुरुस्ती, आवश्यकतेनुसार वृक्षछाटणी, पाणीपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने मशीन दुरुस्ती व जलकुंभ सफाई, दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी, धोकादायक इमारतींचे पुर्नसर्व्हेक्षण व नोटीस बजावणी याबाबतही त्यांनी संबंधीत विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
महानगरपालिका अग्निशमन दलाकडे असलेली उपकरणे व आपत्ती काळात उपयोगी पडणारे साहित्य सुस्थितीत असल्याची काटेकोर पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिका मुख्यालयातील 24 तास 365 दिवस कार्यरत असणारे मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्र व त्याठिकाणची यंत्रसामुग्री यांच्याही कार्यक्षमतेची तपासणी करावी असे त्यांनी सूचित केले. ऐरोली, वाशी व नेरुळ येथील अग्निशमन केंद्रांठिकाणी पावसाळी कालावधीत मागील वर्षीप्रमाणेच आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापित करण्याची कार्यवाही सुरु करुन आठही विभाग कार्यालयाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करुन तेथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या चारही नियंत्रण कक्षांत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत पावसाळी काळात उध्दभवणार्या अडचणींचे त्वरीत निराकरण होण्यासाठी रात्रीच्या कालावधीत आपला प्रतिनिधी उपस्थित ठेवावा असेही त्यांनी सूचित केले.
बैठकीमध्ये उपस्थित विविध प्राधिकरणांच्या उच्च अधिकार्यांशी चर्चा करुन त्यांनी आवश्यक त्याठिकाणी तातडीने पाहणी करण्याचे तसेच पावसाळी कालावधीत उध्दभवणार्या संभाव्य अडचणींबाबत परस्पर समन्वयातून मार्ग काढण्यासाठी प्राधिकरणांमधील अधिकारी वर्गांच्या समन्वय बैठका आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.
शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी समितीचे सचिव तथा मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार व अंकुश चव्हाण, पोलीस उपआयुक्त शहाजी उमप, एमटीएनएलचे सह महाव्यवस्थापक एस. व्ही. कुमार, महानगरपालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सह शहर अभियंता जी.व्ही. राव, वाहतुक पोलीस विभागाचे सहा. पोलीस आयुक्त डी. एस. ठाकूर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, रेल्वेचे एस. के. खरे, एमआयडीसी चे श्री. अविनाश माळी, ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती नियंत्रण अधिकारी संतोष कदम, स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनचे श्री. आर. सेशन, नागरी संरक्षण दलाचे देवेंद्र वावस्कर आदी विविध प्राधिकरणांचे मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
अन्य पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक सत्कार सोहळे व देवदर्शन, लग्न सोहळे यात व्यस्त असताना शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी पावसाळीपूर्व कामांची मागणी केल्याने नवी मुंबईकरांमध्ये नामदेव भगत प्रशंसेचा विषय बनले आहेत. महापालिका प्रशासनात काम करणार्या कंत्राटी कामगारांची कायम सेवा व त्यांचा पीएफ क्रमांक याप्रकरणी नामदेव भगत यांनी सतत पाठपुरावा ठेवल्याने कंत्राटी कामगारांचा मोठा वर्ग नामदेव भगत यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होवू लागला आहे.