लंडन : इराक, सिरीयात धुमाकूळ घालणार्या इसिस या दहशतवादी संघटनेने क्रूर कृत्यानंतर आता घातक अशी अण्वस्त्र मिळवण्याची वल्गना केली आहे. ही अण्वस्त्र येत्या 12 महिन्यात पाकिस्तानकडून मिळवली जातील, असे इसिसचे मुखपत्र दबीकमध्ये नमूद करण्यात आले आहे.
इसिसच्या मुखपत्रात द परफेक्ट स्ट्रॉम या लेखामध्ये इसिस ही नायजेरियातील बोको हरामसारखीच संघटना आहे. पश्चिम आशिया, आफ्रिका, आशियात मोठे बस्तान बसवण्याची योजना या संघटनेने आखली आहे.
इसिसने रणगाडे, रॉकेट लॉँचर, क्षेपणास्त्र डागणारी यंत्रणा, विमानवेधी यंत्रणा मिळवली आहेत. इस्लामी जगताची मोठी बॅँक बनवण्याची योजना आहे. त्याचा वापर करून पाकिस्तानकडून अण्वस्त्र खरेदी करण्याचा बेत शिजत आहे. यासाठी शस्त्रास्त्र दलालांची मदत घेण्यात येणार असून भ्रष्टाचारी अधिकार्यांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा दावा लेखात केला आहे. तसेच आम्हाला अण्वस्त्र न मिळाल्यास हजारो टन अमोनियम नायट्रेटने भरलेल्या स्फोटकांचा साठा वापरला जाईल.
इसिसने दोन वर्षापूर्वी ब्रिटिश नागरिक जॉन कॉँटलीचे अपहरण केले आहे. त्याने दिलेल्या वृत्तानुसार, या दहशतवादी संघटनेने आता अण्वस्त्र बाळगण्याचे ठरवले आहे. कॉँटली हा कायमच या दहशतवादी संघटनेच्या व्हिडीओजमधून दिसत असतो.