नवी दिल्ली – सत्तेत येऊन एक वर्ष झाल्यानंतरही वन रँक, वन पेन्शन योजनेची देशात अंमलबजावणी न करणार्या मोदी सरकारवर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. ही योजना अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शनिवारी राहुल यांनी माजी सैनिकांची भेट घेतली. यूपीए सरकारच्या काळात वन रँक, वन पेन्शन योजनेची घोषणा कऱण्यात आली. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. मात्र मोदी सरकार ही योजना अंमलात आणण्यात अयशस्वी ठरली आहे.
मोदी सरकारला सत्तेत एक येऊन एक वर्ष पूर्ण झाले मात्र या मुद्दयावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माजी सैनिक वारंवार सरकारचे दरवाजे ठोठवत आहेत मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे जवान आपल्या देशाचे संरक्षण करतात त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असे राहुल म्हणाले.
आम्ही या योजनेची घोषणा केली तसेच आर्थिक तरतूदही केली. मोदी सरकार सत्तेत येऊन एक वर्ष होऊन गेले. या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. हे याआधीच व्हायला हवे होते. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणू असे राहुल यांनी सांगितले.