मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन
कोल्हापूर : ‘कॉंग्रेसनं सत्तेचे सेवक नव्हे, दलाल तयार केले. पण, आपल्याला सत्तेचं सेवक बनून काम करायचं आहे. सत्ता आली म्हणून आपली जबाबदारी संपलेली नाही, उलट वाढलेली आहे. सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा,’ असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना केलं.
कोल्हापूर येथे झालेल्या राज्य भाजपच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा रविवारी समारोप झाला. समारोपाच्या भाषणात बोलताना फडणवीस यांनी कॉंग्रेसच्या आतापर्यंतच्या कारभारावर हल्लाबोल केला. शेतकर्यांच्या वाईट परिस्थितीला कॉंग्रेसचं सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘राज्यातील सरकार मजबूत असून शाहू, फुले व आंबेडकरांचा वारसा पुढं नेण्याचं काम करत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी व्हॉट्सऍपवर ग्रुप तयार करून सरकारनं केलेल्या कामाची माहिती वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवावी,’ अशी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.