नवी दिल्ली : प्रत्येक व्यासपीठावर आणि भाषणात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हिरीरीनं मांडणारे आणि त्यासाठी प्रसंगी मित्रपक्ष शिवसेनेला दुखावणारे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुरती गोची केली आहे. ‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कोणाला दिला नव्हता,’ अशी पलटी शहा यांनी मारली आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप कार्यालयात शहा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी राम मंदिर, ३७० कलमांसह वेगळ्या विदर्भ राज्याबद्दलच्या आश्वासनांची आठवण शहा यांना करून दिली. यापैकी राम मंदिर व कलम ३७०च्या मुद्द्यावर शहा यांनी थेट नकार दिला नाही. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपला ‘छप्परफाड’ यश मिळवून देणारा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा त्यांनी अक्षरश: झटकून टाकला. सत्ता आल्यानंतर वेगळा विदर्भ देऊ, असे कुठलेही वचन आम्ही दिले नव्हते, असे शहा यांनी बिनदिक्कतपणे सांगून टाकले. शहा यांच्या या वक्तव्यामुळं विदर्भातील जनतेला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न आता राज्य भाजपपुढं उभा राहिला आहे.
केंद्र व राज्यात भाजपसोबत असलेल्या शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला तीव्र विरोध आहे. दोन्ही पक्षांतील वादांच्या मुद्द्यांपैकी स्वतंत्र विदर्भ हा एक प्रमुख मुद्दा आहे. आता भाजपाध्यक्षांनीच हा मुद्दा बाजूला ठेवल्यानं शिवसेनेला भाजपच्या राज्यातील नेत्यांना डिवचण्याची आयती संधी मिळणार आहे.