ठाणे : राजकारण्यांची होर्डिंगबाजी सर्वसामान्यांना नवीन नसतानाच एक भलतीच होर्डिंगबाजी दिव्यामध्ये पाहायला मिळाली. मुलगा मोठा झाल्यावर त्याचा प्रथम दाढी समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा होण्याचा विचित्र समारंभ दिवा येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी रितसर होर्डिंग्ज लावण्यात आली होती, त्याचबरोबर लग्न-मुंज समारंभाप्रमाणे पत्रिकासुद्धा छापण्यात आल्या होत्या. या विचित्र कार्यक्रमाचीसुध्दा होर्डींगमधून प्रसध्दिी केल्याबद्दल मात्र तरुण वर्गाकडून टीका होत आहे.
अनेक वेगवेगळे तरुण समाजसेवेद्वारे मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा काही कार्यक्रमांद्वारे केवळ पैसे उडविण्याचे प्रकार घडत आहेत आणि यासारख्या प्रकारांमुळे केवळ पैसे खर्च होतात आणि हाती काहीच लागत नाही, असे मत तरुणांनी व्यक्त केले आहे.
ठाण्यात राहणार्या समीर माळी याने बोलताना सांगितले की, याप्रकारच्या प्रकारांना काही अर्थ नाही. असे प्रकार जर होत राहिले, तर यापुढे नखे कापण्याचा समारंभसुद्धा लोक करतील. या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर हा प्रकार म्हणजे पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट आहे, अकारण प्रसिद्धीझोतात येण्याची अनेकांना अपेक्षा असते, त्यामुळे असे वायफळ प्रकार लोक करतात. यासारख्या प्रकारातून साध्य काहीच होत नाही आणि पैसे फक्त खर्च होतात आणि इतरांना त्रास होतो, असे निलेश जगताप याने सांगितले.