उरण : हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीची आई हा सुध्दा एक चर्चेचा विषय असतो. चित्रपटाच्या सेटवर नायिकेची आई उपस्थित असली तर तो माध्यमांमध्ये खमंग चर्चेचा विषय बनतो.
काही वर्षांपूर्वी आलेल्या राम गोपाल वर्माच्या रंगीला चित्रपटातील काही दृश्यामध्ये सेटवर असणारा अभिनेत्रीच्या आईचा वावर दाखवला होता. त्यात निर्मात्याला अभिनेत्रीपेक्षा तिच्या आईचीच मर्जी जास्त संभाळावी लागते असा एक सीन होता.
असो, आजच्या आघाडीच्या नायिका त्यांच्या यशामध्ये आईने दिलेला पाठिंबा, योगदान महत्वाचे मानतात. बदलणारे जाहीरात विश्वदेखील नायिका आणि तिच्या आईमधल्या खर्याखुर्या नात्याचा जिव्हाळा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.
त्यामुळेच अलीकडे दिपीका पदुकोण आणि तिची आई उजाला पदुकोण एका ज्वेलरी ब्राण्डच्या जाहीरातीमध्ये एकत्र दिसल्या होत्या. सोनाक्षी सिन्हानेही आपली आई पूनम सिन्हासोबत एका सौदर्य प्रसाधनाची जाहीरात केली होती.
आता या पंक्तीमध्ये अभिनेत्री आलिया भटचा समावेश होणार आहे. आलिया आणि सोनी राझदान केसांची निगा राखण्याच्या ब्राण्डच्या जाहीरातीत एकत्र झळकणार आहेत. सोनी राझदान यांच्याकडे जेव्हा हा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून टाकले. आलियालाही हा प्रस्ताव आवडला. दोघींवर ही जाहीरात चित्रीत झाली असून, लवकरच ती झळकण्यास सुरुवात होईल.