आमदार संदीप नाईक यांची मागणी
नवी मुंबई : पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळीपूर्व विजेची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी गुरूवारी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणचे मुख्य अभियंता अरुण थोरात यांच्याकडे केली. याबाबतचे एक सविस्तर लेखी निवेदन त्यांनी दिले.
महावितरणसंबधीच्या समस्यांशी चर्चा करण्यासाठी वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात आमदार नाईक यांनी आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक यांच्यासमवेत महावितरणच्या अधिकार्याची एक बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी ही मागणी केली. या घटकांनी केलेल्या मागण्या आमदार नाईक यांनी यावेळी अधिकार्यांसमोर मांडल्या.
नेरुळ, वाशी कोपरखैरणे, तळवली गाव, पावणे गाव, घनसोली, करावे गाव इत्यादी भागात वारंवार वीज गायब होते. या ठिकाणी विजेची मागणी जास्त आहे. त्यामुळे अस्तित्वातील ट्रान्सफॉर्मरवर वीजेचा जास्त भार पडतो. त्यामुळे या ठिकाणी जादा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी आ.नाईक यांनी केली. सर्व ठिकाणच्या उघडया केबल, उघड्या डीपी, ट्रान्सफॉर्मर युनिट बंदिस्त करण्याची सुचना केली.
महावितरण आपल्या दारी ही योजना राबवून नागरिकांना त्यांच्या विभागातच प्रत्यक्ष मिटरचे कनेक्शन देण्याची सुचना त्यांनी केली. यामुळे एकतर विजेच्या चोरीचे प्रमाण कमी होवून महावितरणचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला. नेरुळ आणि वाशी भागात 62 कोटी रुपयांची विजेची कामे प्रस्तावित असून ही कामे पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रोड क्रॉसिंगमध्ये वीेजेची केंबल टाकताना ती 4 फुट खोल टाकणे अपेक्षित आहे परंतु अशा केबल केवळ 1 फुट खोल टाकल्या जातात, असे निदर्शनास आले आहे. एखादे जड वाहन रस्त्यावरुन गेल्यावर या केबल तुटतात. त्यामुळे या केबल 4 फुट खोल टाकून त्याला सुरक्षित आवरण द्यावे, अशी मागणी केली. शहरात सर्व्हेक्षण करुन अशा केबल सुरक्षित करण्याची मोहिम महावितरणने हाती घ्यावी, असेही ते म्हणाले.
शहरात वीज कर्मचार्यांची कमतरता आहे. या विषयी विधानसभेत आवाज उठवून अतिरिक्त कर्मचारीवर्गासाठी मंजुरी घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकनेते गणेश नाईक यांच्या पुढाकाराने वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृहात एक महत्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर शहरातील वीज उपकरणांच्या सुधारकामांसाठी इंन्फ्रा 1 आणि इंन्फ्रा 2 अंतर्गत सुमारे 200 कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. या कामांचा दर्जा चांगला असला पाहिजे, असेही ते म्हणाले. आवश्यकता असेल तर वीज कामांसाठी अतिरिक्त निधीकरीता राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
पावसाळ्यात महावितरणने त्यांची आपत्कालिन व्यवस्था सक्षम आणि जागरुक ठेवावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी बैठकीत केली. नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करावी, संकटकाळी किंवा वीजपुरवठा खंडीत झाल्यावर या हेल्पलाईनवर नागरिकांनी संपर्क साधला असता त्यांना तातडीने आवश्यक माहिती उपलब्ध व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
ऐरोली भागातील अनेक सबस्टेशनमध्ये काही लोक विनापरवाना राहत आहेत. त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय या ठिकाणी अनैतिक धंदे सुरु असतात, अशी माहिती नगरसेवकांनी आणि समाजसेवकांनी बैठकीत दिली. आणि या लोकांना तेथून हटविण्याची मागणी केली.
आमदार संदीप नाईक यांच्या सुचनांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य अभियंता थोरात यांनी दिले. नेरुळ आणि वाशी भागात अतिरिक्त 7 सब स्टेशन तयार होणार आहेत. 350 किमींची उच्चदाब वीजवाहिन्या आणि 250 किंमींची लघूदाब वीजवाहिन्या टाकण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात 2000 हजार फिडर वर्षभरात बदलण्यात येतील, असे यांनी सांगितले.