प्रकल्पग्रस्तांमधून आता आयएएस/आयपीएस अधिकारी घडविण्यासही सिडको सहकार्य करणार
नवी मुंबई : सिडकोच्या आर्थिक सहाय्यामुळे आयआयएम (अहमदाबाद) सारख्या नामवंत संस्थेमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे एका प्रकल्पग्रस्ताच्या पाल्याचे स्वप्न साकार झाले आहे. सिडकोच्या सहकार्यामुळे कुठलीही काळजी अथवा दडपणाशिवाय देशातील सर्वात कठीण पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करता आला आणि उज्ज्वल भविष्याविषयी रंगविलेले स्वप्न वर्तमानात अनुभवत आहे. सिडकोचे मार्गदर्शनपर उपक्रम आजच्या स्पर्धेच्या युगात प्रकल्पग्रस्त युवक-युवतींना आपली स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत कु. प्रज्ञा पाटील हिने सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांना पाठविलेल्या आभारपूर्वक पत्रात व्यक्त केले आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना उज्वल भविष्य प्राप्त व्हावे या उद्देशाने सिडकोतर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रम व शिबीरांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच त्यांना मिळणारी उच्च शिक्षणाची संधी आर्थिक टंचाईमुळे वाया जाऊ नये यासाठी सिडकोकडून नेहमीच आर्थिक पाठबळ पुरविण्यात येते. 21 वर्षीय प्रज्ञा पाटीलचे अहमदाबादमधील आयआयएमसारख्या नामांकित संस्थेमध्ये मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रम शिकण्याचे स्वप्न होते. आणि तिच्या या स्वप्नांना साथ मिळाली सिडको महामंडळाची. सिडकोने प्रज्ञाची शैक्षणिक प्रगतीशील वाटचाल पाहून अहमदाबादमधील आयआयएम संस्थेमध्ये मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमासाठी 12 लाख रुपयांची शैक्षणिक मदत सिडकोने केली होती. या मदतीचे सकारात्मक फळ सिडकोला मिळाले आहे. यशस्वीरित्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रज्ञाला एका नामंकित संस्थेमध्ये उच्च पदावर नोकरीची संधीही उपलब्ध झाली आहे.
आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन बाळगून यशस्वी व्हा असा विचार प्रकल्पग्रस्तांच्या मनात रुजविण्यासाठी सिडको नेहमीच प्रयत्नशील असते. या विचारधारणेची मी मनापासून प्रशंसा करते. सिडकोची भूमिका भविष्यात अन्य प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणार आहे असे सिडकोविषयी कौतुकास्पद मत प्रज्ञाने पत्रात नमूद केले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस/आयपीएस) आपले करिअर घडवू इच्छिणार्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांसाठी सिडकोतर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आयएएस/आयपीएस ऑफीसर बनण्याचे स्वप्न बाळगणार्या प्रकल्पग्रस्त पदवीधर तरुण-तरुणींनी त्यांचे अर्ज दि. 8 जून 2015 पर्यंत ऑनलाईन पाठवावेत. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे पात्र उमेदवारांची प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. दिल्ली येथील नामवंत कोचिंग इन्स्टिट्यूट मधून उमेदवारांनी निवड केलेल्या इन्स्टिट्यूटकडून प्राथमिक व मुख्य या दोन्ही स्तरावरील कोचिंगसाठी आकारण्यात येणारी संपूर्ण फी (सुमारे रू. 2.00 लाख) सिडकोकडून भरण्यात येईल. याशिवाय प्रत्येक उमेदवाराला निवास व भोजन व्यवस्थेकरीता रू. 10,000/- प्रतिमाह विद्यावेतन, दिल्ली येथे सुरूवातीच्या प्रवासाकरीता रू. 3,000/- व कोचिंग क्लास संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रू. 3000/- अनुदान देण्यात येईल. स्वप्ने पूर्ण करणार्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.