ठाणे : मॅगी नूडल्स खाणं तब्येतीला फायद्याचं आहे, असा सल्ला देणं बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित – नेनेला महागात पडू शकतं. मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी हरिद्वारच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं माधुरीला नोटीस पाठवली असून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय. या संदर्भात, पुढच्या 15 दिवसांत तिला खुलासा करावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी, उत्तर प्रदेशात मॅगीमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) आणि शिशाचं प्रमाण अधिक आढळून आलं होतं. या दोन्ही घटकांचं अतिरिक्त सेवन तब्येतीला घातक ठरू शकतं, त्याचे साइड-इफेक्ट्स होऊ शकतात. त्यामुळेच लखनौच्या अन्न व औषध प्रशासन विभागानं या प्रकाराची गंभीर दखल घेऊन हा विषय थेट केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला कळवला होता. त्यानंतर ठिकठिकाणी मॅगीचे नमुने तपासले जात आहेत. मॅगी बाजारातून परत मागवण्याचा निर्णय काही ठिकाणी घेण्यात आलाय. ही बातमी वार्याच्या वेगाने पसरल्यानं, दोनच मिनिटांत भूक भागवणार्या मॅगीची मागणीही घटली आहे. चटपटीत, चटकदार मॅगीचा मोह खवय्ये टाळू लागलेत.
या पार्श्वभूमीवर, मॅगीची जाहिरात केल्यानं माधुरी दीक्षित चौकशीच्या जाळ्यात अडकली आहे. आटा मॅगीतून तीन पोळ्यांइतकं फायबर मिळतं आणि तुम्ही फिट राहता, असा संदेश तिनं या जाहिरातीतून दिलाय. हा खोटा प्रचार असल्याचं हरिद्वार एफडीएचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी माधुरीला मुंबईच्या पत्त्यावर नोटीस पाठवलीय. मॅगी खाणं शरीराला फायदेशीर असल्याचा दावा तुम्ही कशाच्या आधारे करताय? तुम्ही स्वतः मॅगी खाता का? खात नसाल तर का खात नाही?, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. त्यांची उत्तरं 15 दिवसांत न दिल्यास मॅजिस्ट्रेट कोर्टात खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मॅगी खाण्याचा विकतचा सल्ला माधुरीसाठी डोकेदुखी ठरू शकतो.