नवी मुंबई : सिडको अर्बन हाटमध्ये सध्या सुरु असलेल्या समर फेस्टीवलमधील वैविध्यपूर्ण हस्तकला व हातमागाची उत्पादने व खाद्यपदार्थांचे प्रकार ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. फेस्टीवलमध्ये उत्पादनांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त अर्बन हाटच्या प्रेक्षागृहात सायंकाळी सादर करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमांना ग्राहकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरत आहेत. या कार्यक्रमांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २१ मे पासून आरंभ झालेल्या या समर फेस्टीवलची दि. २० जून रोजी समाप्ती होणार आहे.
या समर फेस्टिवलमध्ये विविध १० राज्यांतील कुशल कारागिरांनी तयार केलेली हस्तकला व हातमागाची उत्कृष्ट उत्पादने प्रदर्शित करण्यात आले असून, या उत्पादनांमध्ये साड्या, ड्रेस मटेरिअलस, बेड शीटस, चटया व पडदे यांच्यासोबतच बांबूचे फर्निचर, लाकडाची व टेरिकोटाची उत्पादने यांसारखे हस्तकलेचे व राजस्थानी, वारली, मधुबनी व पटचित्र यांसारखे चित्रकलांचे नमुने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त चामड्याच्या उत्पादनांमध्ये लेडिज बॅग्ज, शूज, खेळणी व जेन्टस वॉलेट, कृत्रिम व पारंपारिक अलंकारांचे विविध नमुने उपलब्ध आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन सक्षम करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानामार्फत सुरु करण्यात आलेल्या उमेद या संस्थेतर्फे तयार करण्यात आलेली हस्तकला व हातमागाची उत्पादने व खाद्यपदार्थ प्रदर्शित करण्यात आले आहेत. या संस्थेच्या वर्ध्याच्या बटतगटाने तयार केलेली खास हळद व खादी बॅग्ज, ठाण्याच्या बचतगटाने तयार केलेली वारली पेंटिंग व टेरिकोटा उत्पादने, नंदूरबारमधील आमचूर पावडर व बांबूची उत्पादने यांसारखी उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली असून, रत्नागिरीचे तळलेले गरे, आंबापोळी, आवाळा पेठा, अहमदनगरमधील शुद्ध तूप व मनुके व नाशिकचे बेदाणे यांसारखे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
खाद्यप्रेमींसाठी चिकन, मटण, फिश करी/ फ्राय, कोकणी खाद्यपदार्थ, सोलकढी, लोणची, राजस्थानी व कोल्हापूरी यांसारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. तसेच लोकप्रिय कलाकारांकडून मधुबनी, राजस्थानी वारली यांसारखे चित्रकलेचे प्रकार, पेपर क्लिलींग वर्क व सजावटीचे नमुने शिकण्याची संधी कलाप्रेमींना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्बन हाटमध्ये यावेळी ग्राहक, संगीत व सिनेमाप्रेमींसाठी विविध मनोरंजन कार्यक्रमांचे रेलचेल आहे. समर फेस्टीवल अविस्मरणीय करण्यासाठी व कलाकरांना कला सादरीकरणाची संधी मिळावी या उद्देशाने डॉक्युमेंट्री फिल्म, ऑर्केस्ट्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच ३१ मे २०१५ रोजी यवनिका थेअटरतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘घर दोघांचे’ या भावस्पर्शी मराठी नाटकाला नाटकप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाची कथा एका प्रेमी युगुलाच्या जीवनावर आधारित असून, आई-वडिलांनी ठरविलेल्या मुलाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेली प्रेमिका आपल्या प्रियकरासोबतच्या शेवटच्या भेटीत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी आपल्या लग्नासाठी आमंत्रित करुन निघून जाते.
भारत सरकारच्या फिल्म डिव्हीजन विभागाच्या समन्वयाने रात्री ७ ते ९ या कालावधीत डॉक्युमेंट्री फिल्म दाखविण्यात येत आहेत. अनंतमूर्ती, ये कहा आ गए हम, पोट्रेट ऑफ अ सिटी, फूलबसन बाई, अ पोएट, अ सिटी ण्ड अ फूटबॉलर व द सुपरस्टार ऑफ कोटी या डॉक्युमेंट्रीज अनुकमे १२,१९ व २० जून रोजी दाखविण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी रात्री ७ ते ९ या कालावधीत यवनिका थेअटरतर्फे मराठी व हिंदी नाटक सादर करण्यात येत आहेत. १४ आणि २१ जून २०१५ रोजी राणी, शकुंतला गोची व अश्वथामा ही नाटक सादर करण्यात येणार आहेत. नाझनीन इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे अनुक्रमे १३ व २० जून रोजी रात्री ७ ते ९ या कालावधीत जुनी गाणी व गझल गायनाच्या कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.