यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आधुनिक शेतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि त्यासाठी पैशाची तजवीज केल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यातील एका मृत शेतकर्याच्या विधवा पत्नीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरीबुटी गावातील प्रल्हाद ताजणे या शेतकर्यानं आत्महत्या केली होती. यवतमाळ दौर्यावर असताना 3 मार्च रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शेतकर्याच्या विधवा पत्नी शांता ताजणे यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी शांता ताजणे यांना विंधन विहिर, मोटरपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सरकारकडून तातडीने शांता ताजणे यांना 70 हजार रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, बँकेतून मदतीचे पैसे काढायचे कसे हे माहीत नसल्यानं अडचणीच्या वेळी त्यांना पैशांचा काहीच उपयोग झाला नाही. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी स्वत:चं जीवन संपवलं.
मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळूनही आत्महत्या होत असल्यामुळे जिल्हा आत्महत्यामुक्त करायचा कसा, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला पडला आहे.