ठाणे : गेल्याच आठवड्यात येरवडा तुरुंगात जाऊन मी त्याला भेटले. त्याला भेटून आनंद झाला. सगळं काही सुरळीत पार पडलं तर डिसेंबरपर्यंत संजू घरी असेल. हे उद्गार आहेत 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला आरोपी अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यताचे! तिच्या म्हणण्यानुसार, संजय दत्त डिसेंबरपर्यंत जेलमधून सुटणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा त्याने आधीच भोगलेली असल्याने उर्वरीत साडेतीन वर्षांच्या शिक्षेसाठी त्याला येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
संजय दत्तचा तुरुंगवास ऑगस्टअखेर संपेल, अशी चर्चा याआधी होती. मात्र, तो 2016पर्यंत तुरुंगातच असेल असंही सांगितलं जात होतं. आता मान्यतानंच तो डिसेंबरमध्ये सुटेल अशी आशा व्यक्त केल्यानं पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे.
संजय दत्तच्या शिक्षेचा कालावधी संपून तो डिसेंबरमध्ये तुरुंगातून सुटणार असल्याचे मान्यता म्हणत असली तरी गेल्या काही महिन्यांत त्याने अनेकदा फर्लो रजा घेतल्या होत्या. या रजेचे दिवस शिक्षेच्या कालावधीतून वजा केल्यास संजय दत्तचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे.