नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारपासून पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली असून आज सकाळपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर विभाग ८.३ मि.मी., नेरुळ ५.८ मि.मी., वाशी १३.६ मि.मी., ऐरोली १२.५ मि.मी. अशाप्रकारे सरासरी १०.०५ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.
पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्वतयारी झालेली असून महापालिका मुख्यालयात ३६५ दिवस कार्यान्वित मध्यवर्ती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळी कालावधीत नेरुळ, वाशी व ऐरोली अग्निशमन केंद्रात २४ तास कार्यरत आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्याठिकाणी आपत्तीमध्ये मदतकार्य करणारे समूह व पाणी उपसापंपासह आवश्यक यंत्रसामुग्री कार्यरत ठेवण्यात आलेली असून आठही विभाग कार्यालयात २४ तास कक्ष कार्यरत असणार आहेत याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पावसाळी कालावधीत संपूर्ण सहकार्य करावे असे सूचित केले आहे.
आपत्ती निवारणाकरीता विभाग क्षेत्रात कार्यरत विभाग अधिकारी यांच्यासह कार्यकारी अभियंता दर्जाचे क्षेत्रीय अधिकारी व उप आयुक्त दर्जाचे नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील हवामान व पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन तत्परतेने अपेक्षित कार्यवाही करण्याच्या दृष्टीने अल्ट्रासोनिक पर्जन्यमापक यंत्रणा सर्व नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले असून दूरध्वनीसह बिनतारी यंत्रणा तसेच हॅमरेडिओ यंत्रणा बसविण्यात आली आहे.
महापालिका मुख्यालयातील तत्काळ कृती केंद्रातील आपत्कालीन यंत्रणा अत्यंत अद्ययावत व आधूनिक असून त्याठिकाणी तात्काळ संपर्कासाठी हॉटलाईनची सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंत्रालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, पोलीस वाहतुक शाखा, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, एन.एम.एम.टी., सार्वजनिक रुग्णालय वाशी, अग्निशमन दल, वाशी रेल्वे स्टेशन अशा महत्वाच्या कार्यालयांशी विना व्यत्यय तात्काळ संपर्क साधणे शक्य होत आहे. याव्दारे सर्व संबंधित प्राधिकरणांमध्ये परस्पर समन्वय राखला जावून आपत्कालीन परिस्थितीचा नियमित आढावा घेणे शक्य होणार आहे व गरजेच्या वेळी तात्काळ मदत करणे सोपे होणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीतील तात्काळ संपर्कासाठी दळवळण यंत्रणा म्हणून आठ विभाग कार्यालये व आपत्कालीन नियंत्रण कक्ष मुख्यालय याठिकाणी वायरलेस संच उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना धोक्याच्या प्रसंगी सूचना देण्यासाठी महापालिका मुख्यालयासह सी.बी.डी., वाशी व ऐरोली अग्निशमन केंद्र से. ४४ नेरूळ जलकुंभ, नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व दिघा विभाग कार्यालये अशा शहरातील मध्यवर्ती १० ठिकाणी भोंगे (सायरन) बसविण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका पावसाळी कालावधीत नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यादृष्टीने दक्ष असून नागरिकांनीही भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास घाबरुन न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करीत महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नागरिकांनी याबाबतच्या आपल्या सूचना / माहिती नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३०९ व १८००२२२३१० यावर कळवाव्यात असे सूचित केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीतील महत्वाचे संपर्कध्वनी क्रमांक
१) टोल फ्री क्रमांक (मोफत दूरध्वनी सेवा) – १८००२२२३०९ / १८००२२२३१०
२) तात्काळ कृती केंद्र, महानगरपालिका मुख्यालय, सी.बी.डी., बेलापूर – २७५६ ७०६० / ७०६१
३) आपत्कालीन नियंत्रण कक्ष, वाशी – २७८९ ४८०० / २७८९ ५९००
४) आपत्कालीन नियंत्रण कक्ष, ऐरोली – २७७९ २४०० / २७७९ ५२००
५) आपत्कालीन नियंत्रण कक्ष, नेरुळ – २७७० ७१०१